मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या काढणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !
कुर्ला बस दुर्घटना
मुंबई – कुर्ला बस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ७ व्यक्तींपैकी कन्नीस अन्सारी (वय ५५ वर्षे) यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्याचा माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार काही चोरट्यांनी केला. या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध चालू आहे. हेल्मेट घालून मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढत असलेली व्यक्ती आणि तिचा सहकारी व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.
मुंबईत चरस आणि शस्त्र बाळगणार्या धर्मांधाला अटक !
मुंबई – पवई पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत १३ किलो २१७ ग्रॅम चरस आणि शस्त्र यांसह एका सराईत आरोपी महंमद सादिक हनिफ सय्यद (वय ४६ वर्षे) याला अटक केली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाचे मूल्य साडेतीन कोटी रुपये आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही अमली पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा नोंद आहे. त्याच्याकडे चरससह गावठी बनावटीचा कट्टाही सापडला.
संपादकीय भूमिका : गुन्हेगारीत धर्मांधांचा वाढता सहभाग धोकादायक !
‘टी.सी.एस्.’ आस्थापन पंढरपूरसाठी ‘टोकन दर्शन पद्धती’ विकसित करणार !
पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना दर्शन सुलभ, सुखकर आणि वेळेत व्हावे, यांसाठी तिरुपती आणि शिर्डी देवस्थान यांच्या धर्तीवर ‘टोकन दर्शन पद्धती’ राबवण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करून देण्यासाठी ‘टी.सी.एस्.’ आस्थापनाला प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव ‘टी.सी.एस्.’ने मान्य केला असून सदरची आस्थापन विनामूल्य संगणकीय प्रणाली मंदिरे समितीला विकसित करून देणार आहे, अशी माहिती ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. या संदर्भात भक्तनिवास येथे मंदिरे समितीची बैठक झाली. त्यात ही माहिती दिली.
या प्रसंगी विविध सदस्य, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांसह अन्य उपस्थित होते.
लाडकी बहीण योजनेच्या अफवांवर विश्वास ठेवू नये ! – अदिती तटकरे
मुंबई – ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’विषयीच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना, आदेश, शासन निर्णय पालटण्यात आलेला नाही. विनाकारण माध्यमांवर अफवा पसरवल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नये. लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने माता-भगिनीसाठी काढलेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वीरित्या चालू रहाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.