१ डिसेंबरपासून महाविद्यालये झाली चालू !
मुंबई : विद्यार्थ्यांना राज्यात ‘अॅक्युपंक्चर’ अभ्यासक्रमाचे शास्त्रशुद्ध शिक्षण आणि नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी ‘महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषदे’ने राज्यात १२ नवीन अॅक्युपंक्चर महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. ही नवीन महाविद्यालये १ डिसेंबरपासून चालू झाली असून यांपैकी अनेक महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
१. अॅक्युपंक्चर उपचार पद्धत शिकवणार्या महाविद्यालयांचे हे पहिलेच वर्ष असल्याने रिक्त जागांवर प्रवेश दिला जात आहे. या नव्या १२ महाविद्यालयांमुळे देशात मान्यताप्राप्त पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
२. या अभ्यासक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. विद्यापिठाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी पुढील काही महिन्यांमध्ये प्रयत्न करण्यात येतील. पदव्युत्तर अभ्यासक्रमही लवकर चालू होण्याची शक्यता आहे, असे परिषदेतील अधिकार्याने सांगितले.
३. सध्या प्रत्येक महाविद्यालयात ५० जागांना मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात अॅक्युपंक्चर उपचारपद्धतीच्या ६०० जागा उपलब्ध झाल्या आहेत.
अॅक्युपंक्चर शास्त्र काय आहे ?अॅक्युपंक्चर ही एक वैद्यकीय उपचार पद्धत आहे. यामध्ये आरोग्याच्या समस्येवर उपचार करण्यासाठी शरिरावरील विशिष्ट बिंदूंच्या ठिकाणी सुया टोचून उपचार केले जातात. |