उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वेदश्री दयानंद जड्यार ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. वेदश्री दयानंद जड्यार उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१.१०.२०२४) |
‘आश्विन कृष्ण षष्ठी (२२.१०.२०२४) या दिवशी कु. वेदश्री दयानंद जड्यार हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
कु. वेदश्री दयानंद जड्यार हिला तिच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. धर्माचरण करण्याची आवड
ती नेहमी सात्त्विक कपडे घालते. ती कपाळावर कुंकू लावते. ती आम्हाला वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला सांगते. ती शाळेत होणार्या चित्रपटातील गाणी असलेल्या कार्यक्रमात सहभागी होत नाही. ती सात्त्विक भक्तीगीते असलेल्या चांगल्या कार्यक्रमात सहभागी होते.
२. साधना
तिला साधनेची ओढ आहे. ती प्रतिदिन नामजपादी उपाय करून शाळेत जाते. ती आम्हाला पूजेसाठी फुले आणून देते. तिने ‘अग्निहोत्र कसे करायचे ?’, ते शिकून घेतले आहे. ती भक्तीसत्संग ऐकते. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचते.
३. चुकांविषयी संवेदनशील
आमच्याकडून काही चुका झाल्यास वेदश्री आमच्या लक्षात आणून देते. तिच्या शाळेतील मैत्रिणी किंवा शिक्षक यांच्याकडून काही चुका झाल्यास वेदश्री ते त्यांच्या लक्षात आणून देते.
४. सेवेची आवड
तिने वर्ष २०२४ मधील गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या वेळी मला साहाय्य केले. तिच्या शाळेला सुटी असतांना आम्ही तपोधाम येथे सेवेसाठी गेलो होतो. तेव्हा तिने मला सेवेत साहाय्य केले.
५. गुरूंप्रती भाव
आमच्या घरी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लहान छायाचित्र आहे. वेदश्री ते छायाचित्र प्रतिदिन पुसते आणि त्याला फुले वहाते. ती सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे चित्र काढते. ती ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांच्या मालिकेतील ग्रंथांचे वाचन करते.
६. वेदश्रीला आलेल्या अनुभूती
अ. ती रात्री झोपत असतांना मी तिला थोपटते. तेव्हा ‘आमची कुलदेवी श्री भवानीदेवी तिला थोपटून झोपवत आहे’, असे तिला वाटते.
आ. ‘तिचा झोपेत नामजप चालू असतो’, असे तिला जाणवते.’
– सौ. प्रीती दयानंद जड्यार (कु. वेदश्रीची आई), सरंद, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. (२०.६.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |