गोव्यात न्यायालयीन अकादमी चालू करा !  – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

पणजी, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाचे (आर्बिट्रेशनचे) केंद्र बनवून गोव्याला जागतिक आर्थिक केंद्र बनवूया. यासाठी राज्यात राज्य न्यायालयीन अकादमी चालू करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. मेरशी येथे १९ ऑक्टोबर या दिवशी उत्तर गोवा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड बोलत होते. या वेळी मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, गोव्याचे कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा, गोव्याचे महाधिवक्ता देवीदास पांगम, उपसॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई आदींची उपस्थिती होती.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड पुढे म्हणाले, ‘‘आज गोव्याचे नाव जगभर पसरले आहे. देशातील अनेक आस्थापने ज्या व्यावसायिक लवादासंबंधीची प्रकरणे घेऊन सिंगापूर येथे जात आहेत, त्या गोव्यात येऊ शकतात. त्यासाठी गोव्यात व्यावसायिक लवाद विकसित होण्याची आवश्यकता असून न्यायालयीन अकादमी स्थापन करणे आवश्यक आहे. ही अकादमी उच्च न्यायालयाच्या आल्तिनो येथील जुन्या इमारतीत चालवली जावी. ही वारसा इमारत असून या वास्तूत न्यायालयाच्याही भावना गुंतलेल्या आहेत. याचा सकारात्मक वापर करावा. या अकादमीकडून केवळ न्यायाधिशांनाच नव्हे, तर सनदी अधिकारी, पोलीस आदी सर्वांना प्रशिक्षण द्यावे. गोवा जागतिक व्यावसायिक लवाद म्हणूनही याच मार्गाने विकसित केला जावा. यामुळे भविष्यात गोवा जागतिक आर्थिक केंद्र बनेल. देशातील आस्थापनांनी व्यावसायिक लवादाच्या प्रकरणांसाठी देशाबाहेर का जावे ? त्यांनी गोव्यात यावे, अशी परिस्थिती आपण बनवू शकतो.’’

लोकांना वेळेत न्याय मिळावा, हाच सरकारचा हेतू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘राज्यात न्यायालयीन साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आतापर्यंत सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. जनतेला न्याय लवकर मिळावा, लोक न्यायापासून वंचित राहू नयेत, हीच यामागची अपेक्षा आहे.’’