सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहिल्‍यामुळे साधिकेमध्‍ये साधकांप्रती निर्माण झालेला भाव !

‘गुरुदेवांच्‍या कृपेमुळे मी सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून देत असे. मे २०२३ मध्‍ये सद़्‍गुरु काका मला म्‍हणाले, ‘‘सहसाधकांमध्‍ये गुरुरूप पहाण्‍याचा प्रयत्न करायचा असतो. त्‍यामुळे सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून द्यायची असतात.’’ त्‍यानंतर मी ‘सहसाधकांच्‍या हृदयमंदिरात सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा वास आहे’, असा भाव ठेवून त्‍यांचे गुण पहाण्‍याचा आणि लिहून देण्‍याचा प्रयत्न केला. तेव्‍हा मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि माझ्‍यात निर्माण झालेला भाव गुरुदेवांच्‍या पावन श्रीचरणी अर्पण करत आहे.

कु. पूनम चौधरी

१. साधकांमधील गुण न पहाता साधकांविषयी नकारात्‍मक विचार करणे आणि त्‍यावर मात करण्‍यासाठी प्रार्थना करणे

पूर्वी मी साधकांमधील गुण न पहाता ‘साधकांकडून कशा चुका होतात ?’, असा बहिर्मुखतेने विचार करायचे. साधकांच्‍या प्रकृतीविषयीही माझ्‍या मनात नकारात्‍मकता असायची. मी साधकांकडून अपेक्षा करायचे. तेव्‍हा गुरुकृपेमुळे स्‍वतःची विदारक स्‍थिती माझ्‍या लक्षात आली. जेव्‍हा मी साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहित होते, तेव्‍हाही मला साधकांच्‍या अनेक चुकाच आठवायच्‍या. या संदर्भात सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ४० वर्षे) हिच्‍याशी बोलल्‍यावर तिने मला एक प्रार्थना सांगितली, ‘हे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, साधकांविषयी माझ्‍या मनात ईर्ष्‍या, तुलना किंवा पूर्वग्रह यांचे विचार आहेत, ते नष्‍ट होऊ देत. सर्व साधकांप्रती माझ्‍या मनात सद़्‍भावना निर्माण होऊ दे.’ गुरुदेवांच्‍या कृपेने प्रत्‍येक घंट्याला माझ्‍याकडून ही प्रार्थना होऊ लागली. तसेच ज्‍या साधकांविषयी माझ्‍या मनात पूर्वग्रह होता, त्‍यांच्‍याविषयी गुरुदेवांनी आर्तभावाने माझ्‍याकडून प्रार्थना करून घेतली, ‘गुरुदेव, माझ्‍या मनाचे सर्व विकार आपणच नष्‍ट करा. या हृदयमंदिरात केवळ आपलेच रूप राहू दे. सर्व साधकांमध्‍ये मला आपलेच रूप पहाता येऊ दे.’

२. साधकांप्रती कृतज्ञता वाटू लागणे आणि साधकांना निरपेक्षतेने साहाय्‍य करणे

मी साधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहायला आरंभ केल्‍यानंतर साधकांप्रती मला कृतज्ञता वाटू लागली. ‘सहसाधक माझे गुरुबंधु आहेत’, असे मला वाटू लागले. ‘जो हरिभक्‍तांची सेवा करतो, तोच श्री हरीला प्रिय होतो’, हा विचार माझ्‍या मनात गुरुदेवांच्‍या कृपेने येऊन साधकांना निरपेक्षतेने साहाय्‍य करता येऊ लागले. गुरुकृपेमुळे मनात साधकांप्रती सकारात्‍मकता निर्माण झाली. त्‍यामुळे मी ‘कोणत्‍याही प्रसंगात सहसाधकांना कशा प्रकारे साहाय्‍य करू शकते ?’, हे मला सुचूू लागले.

३. सहसाधकांचे गुण लिहून काढणे, साधकांना समजून घेणे आणि साधकांनी चूक सांगितल्‍यावर क्षमायाचना करणे

मी सहसाधकांचे गुण लिहून काढले. एखाद्या परिस्‍थितीत साधक मला साहाय्‍य करू शकले नाहीत, तर ती परिस्‍थिती ईश्‍वराने मला शिकवण्‍यासाठी निर्माण केली आहे. यासाठी गुरुदेवांच्‍या श्रीचरणी कृतज्ञता व्‍यक्‍त होऊ लागली. साधक जेव्‍हा माझ्‍या लहान चुका लक्षात आणून देतात, तेव्‍हा मी मनापासून त्‍यांच्‍याकडे क्षमायाचना करू लागले.

४. स्‍वभावदोष आणि अहं न्‍यून होणे अन् प्रार्थना, नामजप, अनुसंधान यांमध्‍ये वृद्धी होणे

मनात साधकांप्रती कृतज्ञताभाव टिकून राहिल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये गुरुरूप पहात आले. त्‍यामुळे त्‍वरित निष्‍कर्ष काढणे, पूर्वग्रह, स्‍वतःला श्रेष्‍ठ समजणे, अपेक्षा करणे या माझ्‍यातील स्‍वभावदोषांमुळे निर्माण होणारे विचार आपोआपच न्‍यून होऊ लागले. गुरुदेवांच्‍या कृपेमुळेच प्रत्‍येक परिस्‍थितीत अंतर्मुखतेने विचार होऊ लागले. माझ्‍यातील स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍यामुळेच मनात अयोग्‍य विचार येतात. त्‍याच वेळी सौ. सुप्रिया माथूर (आध्‍यात्मिक पातळी ६७ टक्‍के) घेत असलेल्‍या व्‍यष्‍टी आढाव्‍यात शिकण्‍याची मला संधी मिळाली. त्‍यामुळे माझ्‍या मनाची नकारात्‍मकता न्‍यून झाली. त्‍यामुळे ‘गुरुदेवांनी जो वेळ साधना करण्‍यासाठी दिला आहे, तो मी व्‍यर्थ गोष्‍टी करण्‍यात घालवत आहे’, याची जाणीव मला होऊ लागली. ‘त्‍यासाठी प्रत्‍येक प्रसंग आणि परिस्‍थिती यांमध्‍ये गुरुदेवांना काय अपेक्षित आहे ?’, याचे चिंतन होऊ लागले. तेव्‍हा माझे मन प्रार्थना, नामजप आणि अनुसंधान यांमध्‍ये रमू लागले. ‘आम्‍ही सर्व साधक गुरुदेवांचाच अंश आहोत. त्‍यामुळे आम्‍ही सर्व एकच आहोत’, हा भाव मनात टिकू लागला.

५. सहसाधिकांमध्‍ये गुरुरूप पहाणे

गुरुदेवांच्‍या कृपेने ‘जेव्‍हा सहसाधिका खोलीत येते किंवा मी ज्‍या साधिकांच्‍या समवेत रहाते, त्‍या साधिकांच्‍या रूपात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ किंवा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याच आहेत आणि जेव्‍हा एखादी साधिका भेटायला खोलीत येते, तेव्‍हा साधिकेच्‍या रूपाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ किंवा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ याच भेटायला आल्‍या आहेत, असा भाव ठेवण्‍याचे प्रयत्न होऊ लागले.

६. प्रार्थना

गुरुदेव, मी सहसाधकांकडून आपल्‍याला अपेक्षित असे शिकायला न्‍यून पडले. सद़्‍गुरु काकांनी सांगितलेले प्रयत्न, सुश्री (कु.) मधुरा भोसले ताईने सांगितलेली प्रार्थना आणि सौ. सुप्रिया माथूर घेत असलेल्‍या व्‍यष्‍टी साधनेचा आढावा यांमुळे माझ्‍या मनावरील मळ धुतला जाऊन माझे मन निर्मळ झाले. आता मी गुरुदेवांचे अस्‍तित्‍व अनुभवू शकत आहे. ‘गुरुदेवा, आपल्‍याला अपेक्षित असे प्रयत्न माझ्‍याकडून प्रत्‍येक क्षणी करून घ्‍या. या चराचरातील प्रत्‍येक जिवाकडून अखंड शिकून सर्वांमध्‍ये मला आपले रूप पहाता येऊ दे. आपल्‍याला अपेक्षित अशी साधना करता येऊ दे’, हीच आपल्‍या परम दिव्‍य श्रीचरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.

७. कृतज्ञता

गुरुदेव, आपण फार कृपाळू आहात. आपल्‍याच कृपेने मला सद़्‍गुरु आणि संत यांचे मार्गदर्शन लाभते. आपणच माझ्‍याकडून सर्व प्रयत्न संतांच्‍या संकल्‍पाने करून घेत आहात. आपण आपले सगुण रूप असलेले सद़्‍गुरु आणि संत यांना आम्‍हा सर्व साधकांच्‍या जीवनात देऊन आमच्‍यावर अपार कृपा करत आहात. गुरुदेव, आम्‍हा सर्व साधकांना हा शरणागतभाव, कृतज्ञताभाव प्रत्‍येक क्षणी टिकवून ठेवायला सांगत आहात. गुरुदेवा, आपल्‍या या कृपेसाठी माझ्‍याकडे शब्‍द अपुरे आहेत. गुरुदेव, आपण आम्‍हा सर्व साधकांना एवढे अखंडपणे देत आहात की, असे वाटते ‘बस, आता केवळ अखंड कृतज्ञताच !’

– गुरुदेवांच्‍या पावन श्रीचरणांवरील धूलीकण,

कु. पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.४.२०२४)