Elections Maharashtra : महाराष्‍ट्रात २० नोव्‍हेंबरला निवडणूक

  • झारखंडमध्‍ये १३ आणि २० नोव्‍हेंबरला मतदान

  • २३ नोव्‍हेंबरला निकाल !

नवी देहली – केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्‍ट्र आणि झारखंड येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. झारखंडमध्‍ये २ टप्‍प्‍यांत म्‍हणजे १३ आणि २० नोव्‍हेंबर या दिवशी मतदान होणार, तर महाराष्‍ट्रात एकाच टप्‍प्‍यांत म्‍हणजे २० नोव्‍हेंबर २०२४ या दिवशी मतदान होणार आहे. दोन्‍ही राज्‍यांची मतमोजणी २३ नोव्‍हेंबरला होणार, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्‍त राजीव कुमार यांनी दिली.

निवडणुकांच्‍या या घोषणेनंतरच दोन्‍ही राज्‍यांत आचारसंहिता लागू करण्‍यात आली. या राज्‍यांमध्‍ये २६ नोव्‍हेंबर २०२४ पूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक होते.

महाराष्‍ट्रात २२ ऑक्‍टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्‍याला प्रारंभ होईल, तर २९ ऑक्‍टोबरला उमेदवारी अर्ज भरण्‍याची शेवटचा दिनांक असेल. अर्ज मागे घेण्‍याची मुदत ४ नोव्‍हेंबर २०२४ अशी असणार आहे. विशेष म्‍हणजे २० नोव्‍हेंबरलाच नांदेड येथील लोकसभेची पोटनिवडणूकही घेतली जाणार आहे.