काणकोण, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – दुचाकी वाहनांचे वाढते अपघात आणि शिरस्त्राण न वापरता वाहने चालवण्याचे प्रकार लक्षात घेऊन काणकोणचे मामलेदार श्री. मनोज कोरगावकर यांनी शिरस्त्राण न वापरणार्या दुचाकीचालकांना इंधन (पेट्रोल) देऊ नये, असा आदेश दिल्यानंतर तालुक्यातील सर्व पेट्रोलपंप मालकांनी ‘हेल्मेट (शिरस्त्राण) नाही, तर पेट्रोल नाही’ (No Helmet No petrol) असे पोस्टर्स लावल्याचे दिसून आले आहे.
काणकोणमध्ये पोळे, दापट (माशे), गुळे येथील पेट्रोलपंपांवर असे फलकही लावण्यात आले आहेत. सध्या शिरस्त्राण न वापरल्याने दुचाकी वाहनचालकांचे अपघातांमध्ये बळी पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. १८ वर्षांखालील मुलेही दुचाकी चालवत असल्याचे लक्षात घेऊन काणकोणमधील वाहतूक पोलिसांनी अंतर्गत रस्त्यांवर कडक पडताळणी चालू केली आहे. १४ ऑक्टोबरपासून यानुसार कार्यवाही चालू झाली आहे. याखेरीज या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याची माहिती मामलेदार कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, विना शिरस्त्राण प्रवास करणार्यांवर वचक बसावा आणि शिरस्त्राण न वापरल्याने जे दुष्परिणाम होत आहेत, त्याला आळा बसावा, यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न आहेत. मामलेदार आणि वाहतूक पोलीस यांनी चालू केलेल्या या मोहिमेविषयी समाजातील सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
संपादकीय भूमिका
|