२१.१०.२०२३ या दिवशी चिंबल (गोवा) येथील अशोक वासुदेव नाईक यांचे निधन झाले. १०.१०.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त त्यांची पत्नी श्रीमती शीला अशोक नाईक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. साईबाबांवर श्रद्धा असणे
‘आमच्या लग्नानंतर यजमान मला नेहमी म्हणायचे, ‘‘साईबाबा आहेत. तेच सर्व करणार आहेत. आपण कुठलीच चिंता करायची नाही.’’
२. पत्नीला साधना करण्यास प्रोत्साहन देणे
अ. माझे यजमान मला ‘तू सेवा करायला जा’, असे सांगत असत. एखाद्या दिवशी मी सेवेला जाण्याचा कंटाळा केला, तर ते मला थोडा वेळ तरी सेवेला जाण्यास सांगायचे.
आ. ते मला नामजप करण्याची आठवण करून द्यायचे. मी अनावश्यक बोलत असेन, तेव्हा ते मला ‘अनावश्यक बोलण्यापेक्षा नामजप कर’, असे सांगत असत.
३. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग आहे’, असा भाव असणे
यजमानांना सकाळी चहा घेतल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्याची सवय होती. ते दैनिक पूर्ण वाचत असत. ते मला त्यातील महत्त्वाची सूत्रे वाचायला सांगायचे. एखाद्या दिवशी दैनिक विलंबाने आले, तर ते बेचैन होत असत. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संगच आहे’, असे त्यांना वाटत असे.
४. नवीन चारचाकी गाडी घेऊन आश्रमात गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी गाडी चालवून पहाणे आणि गाडी घेऊन कुलदेवतेला जाण्यास सांगणे
काही वर्षांपूर्वी आम्ही नवीन चारचाकी गाडी घेतल्यावर गाडी घेऊन फोंडा (गोवा) येथे गेलो. तेथे आमची गुरुदेवांशी भेट झाली. तेव्हा मी त्यांना पेढा दिला आणि नवीन गाडी घेतल्याचे सांगितले. गुरुदेवांना पुष्कळ आनंद झाला. ते गाडी पहाण्यासाठी आले. त्यांनी आम्हाला गाडीत बसवले आणि स्वतः गाडी चालवली. त्यांनी आम्हाला गाडी घेऊन कुलदेवतेला जाण्यास सांगितले.
५. प.पू. गुरुदेवांप्रतीचा भाव
सनातनच्या संपर्कात आल्यापासून ‘गुरुदेवच आपले सर्वस्व आहेत. तेच आपली सर्व काळजी घेत आहेत. आपल्याला आणखी काहीच नको’, असा त्यांचा भाव होता. साधक घरी आले की, त्यांना ते आपल्या अनुभूती सांगायचे. त्या वेळी त्यांचा गुरुदेवांप्रतीचा अपार भाव जाणवायचा.
६. गुरुदेवांनी यजमानांचे केलेले कौतुक !
एकदा मला गुरुदेवांसाठी आश्रमात महाप्रसाद नेऊन देण्याची सेवा मिळाली. त्या वेळी गुरुदेवांनी माझ्या कुटुंबियांची विचारपूस केली. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.
परात्पर गुरु गुरुदेव : घरी कोण कोण आहेत?
मी : माझे यजमान आणि २ मुले आहेत.
परात्पर गुरु गुरुदेव : त्यांच्यासाठी घरी महाप्रसाद बनवला का ?
मी : नाही. ते आज साईबाबांच्या मंदिरात महाप्रसादासाठी जाणार आहेत.
परात्पर गुरु गुरुदेव : तुमच्या यजमानांची साधना आहे; म्हणून त्यांनी तुम्हाला सेवेला पाठवले.
७. अनुभूती
घरी एकटे असतांना उच्च रक्तदाबाचा त्रास होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर बरे वाटून ‘आपला पुनर्जन्म झाला आहे’, असे जाणवणे : एके दिवशी यजमान घरी एकटेच होते. मी आणि मुले नोकरीला गेलो होतो. अकस्मात् यजमानांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा ते धडपडत देवघरात गेले. देवघरातील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहून ते म्हणाले, ‘प.पू. गुरुदेव, मी इथे एकटाच आहे. मला बरे वाटत नाही. तुम्हीच माझे रक्षण करा.’ त्या वेळी त्यांना ‘त्यांच्या शरिरात काहीतरी जात आहे’, असे जाणवले आणि बरे वाटू लागले. नंतर ते पलंगावर झोपले. त्यांना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवली. त्यांनी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली, ‘गुरुदेवा, तुमच्यामुळेच आज मी जिवंत आहे.’ त्यांना ‘आपला पुनर्जन्म झाला आहे’, असे वाटत होते. ही अनुभूती त्यांनी आम्हाला संध्याकाळी सांगितली.
८. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे
८ अ. संसारातील आसक्ती न्यून होऊन ‘साधनाच करावी’, असे वाटणे : निधनाच्या आधी एक वर्ष यजमान मला म्हणायचे, ‘‘मला आता कसलीही काळजी नाही. मला कसलीही ओढ वाटत नाही. मी पूर्ण समाधानी आहे. मला ‘साधना आणि नामजपच करत रहावा’, असे वाटते. देवाने कधीही बोलावले, तरी मी जायला सिद्ध आहे.’’ ते निश्चिंत असायचे आणि अधूनमधून गुरुदेवांना आळवायचे.
८ आ. ‘साधकाच्या रूपात प.पू. गुरुदेवच भेटायला आले आहेत’, असे वाटणे : यजमानांच्या निधनाच्या ३ मास आधी आमच्या घरी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) आणि काही साधक आले होते. तेव्हा यजमानांना त्यांचा सत्संग लाभला. चेतनदादा यजमानांशी मनमोकळेपणे बोलले. तेव्हा ‘चेतनदादांच्या रूपात प.पू. गुरुदेवच भेटायला आले आहेत’, असे त्यांना वाटले.
८ इ. आश्रमातील साधकांनी विचारपूस केल्यावर ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेवांनीच विचारपूस केली’, असे वाटून भावजागृती होणे : यजमानांच्या निधनाच्या ३ दिवस आधी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीनिमित्त ‘देवी यज्ञ’ होता. त्यांच्या निधनाच्या २ दिवस आधी मी आश्रमात गेले होते. तेथे सर्व साधक यजमानांची विचारपूस करत होते. घरी आल्यावर मी त्यांना याविषयी सांगितले. तेव्हा त्यांचा भाव जागृत झाला. ‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवांनीच माझी विचारपूस केली’, असे त्यांना वाटू लागले.
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला प्रेमळ आणि साधनेत साहाय्य करणारे यजमान दिले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती शीला अशोक नाईक (कै. अशोक नाईक यांच्या पत्नी, वय ६५ वर्षे), चिंबल, गोवा. (३०.९.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |