तांदळाचे पीठ आणि देवाला अर्पण केलेल्या बेलपत्रांची भुकटी यांद्वारे बनवणार प्रसाद
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्वनाथ धामच्या परिसरात बनवण्यात आलेला लाडूंचा प्रसाद दसर्यापासून वितरित करण्यास आरंभ करण्यात आला आहे. हा प्रसाद धर्मशास्त्रसंमत असून मंदिर परिसरात असलेल्या अधिकृत ‘काऊंटर’वरूनच भाविकांना तो खरेदी करता येणार आहे. श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादातील भेसळीचा प्रकार समोर आल्यानंतर काशी विश्वनाथ न्यासाने हा निर्णय घेतला आहे.
न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वभूषण मिश्रा म्हणाले की, काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरात सिद्ध केलेला लाडूंचा प्रसाद भाविकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. विजयादशमीला बाबा विश्वनाथांना प्रसाद अर्पण करण्यात आला. शास्त्र आणि पुराणे यांचे वाचन करून त्यानुसार नवा प्रसाद ठरवला आहे. यासाठी शिवपुराणासह इतर धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला आहे.
मिश्रा पुढे म्हणाले की, तांदळाच्या पिठाचा प्रसाद बनवायचे ठरले आहे. याचा उल्लेख पुराणात आढळतो. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या संवादातही तांदळाचा उल्लेख आहे. भगवान शंकर तांदळाच्या पिठाचा आस्वाद घेत असत.
अशा प्रकारे बनवण्यात येणार लाडूंचा प्रसाद !
१. लाडूंचा प्रसाद बनवण्याचे काम केवळ हिंदु कारागिरांनाच दिले जाईल.
२. कारागिरांना आंघोळ करणे बंधनकारक असेल.
३. बेलपत्रात शिवाचे तत्त्व मोठ्या प्रमाणात आकृष्ट होते. यामुळेच बाबा विश्वनाथांना अर्पण केलेली बेलपत्रे एकत्र करून ती धुऊन स्वच्छ करून ती वाळवल्यानंतर त्याची भुकटी बनवून ती प्रसादात मिसळण्यात येणार आहे.
४. अमूल आस्थापनाला प्रसाद बनवण्याचे दायित्व देण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणन संस्थांकडून त्याला मान्यता मिळाली आहे.
५. मंदिर न्यासाने साधारण १० महिन्यांत या नवीन प्रसादाची पाककृती अंतिम केली.
६. बेलपत्राखेरीज हे प्रसादाचे लाडू काळी मिरी, लवंग, देशी तूप आणि तांदळाच्या पिठाने सिद्ध केले जातात. यामध्ये वापरण्यात येणार्या तांदळाची ‘बनास डेअरी’द्वारे शेती केली जात आहे.