Cyber ​​Attacks On Iran : इराणच्‍या अणू प्रकल्‍पांच्‍या संकेतस्‍थळांवर सायबर आक्रमण

या आक्रमणामागे इस्रायल असल्‍याची शक्‍यता !

इराण अणूकेंद्र

तेहरान (इराण) – इराण आणि इस्रायल यांच्‍यामध्‍ये चालू असलेल्‍या तणावामध्‍येच आता इराणच्‍या अणू प्रकल्‍पांच्‍या अनेक आस्‍थापनांवर एकाच वेळी सायबर आक्रमणे झाली आहेत. इराणच्‍या अणू केंद्रांनाही सायबर आक्रमणांत लक्ष्य करण्‍यात आले.

यामुळे इराण सरकारच्‍या जवळपास सर्व सेवा विस्‍कळीत झाल्‍या आहेत. इराणवर प्रत्‍युत्तरादाखल केलेल्‍या आक्रमणाच्‍या दिशेने इस्रायलचे हे पहिले पाऊल असल्‍याचे म्‍हटले जात आहे. १ ऑक्‍टोबर या दिवशी इराणने इस्रायलवर शेकडो क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण केले होते.

इराणच्‍या सर्वोच्‍च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी म्‍हणाले की, आमच्‍या अणू प्रकल्‍पांवर, तसेच इंधन वितरण, नगरपालिका सेवा, वाहतूक आणि बंदरे यांच्‍या संकेतस्‍थळांवरही सायबर आक्रमणे झाली आहेत.