रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळी (मुंबई) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार !

मुंबई – रतन टाटा यांचे पार्थिव प्रथम प्रार्थनागृहात ठेवण्यात आले. तेथे पारशी परंपरेतील ‘गेह-सारनू’ वाचण्यात आले. टाटा यांच्या पार्थिवाच्या तोंडावर कापडाचा तुकडा ठेवून ‘अहनवेती’चा संपूर्ण पहिला अध्याय वाचण्यात आला. ही शांती प्रार्थनेची प्रक्रिया आहे. यानंतर विद्युत्दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नायडू, रतन टाटा यांचे धाकटे भाऊ जिमी टाटा यांच्यासह अनेक नेत्यांनी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा यांचा पाळीव कुत्रा ‘गोवा’ यालाही तेथे आणले होते.