श्री मलंगगडावर ललिता पंचमी उत्साहात साजरी !

टाळ-मृदुंगाच्या गजरात दुमदुमला श्री मलंगगड

ठाणे, १० ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रीच्या पाचव्या दिवशी मलंगगडावर वारकर्‍यांची प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात दिंडी जाते. यंदाही ठाणे, रायगड जिल्ह्यांतील वारकर्‍यांच्या सहभागाने मलंगगडावर पायी दिंडी निघाली होती. श्री मलंगगडाच्या प्राचीन दत्त मंदिरापासून या दिंडीचे सकाळी ७ वाजता प्रस्थान झाले, तर श्री मलंगमत्स्येंद्र नाथांच्या मंदिरात महाआरती करून दिंडीची सांगता करण्यात आली. श्री मलंगगडावर शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ललिता पंचमी उत्सव चालू केला होता.

नवरात्रीच्या पाचव्या माळेला मोठ्या संख्येने वारकरी गळ्यात टाळ-मृदंग आणि मुखात रामनाम म्हणत मलंगगडावर जातात. यंदाही वारकरी मोठ्या संख्येने दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. वारकर्‍यांचे श्री मलंगगडाच्या पायथ्याशी आलेल्या शिवसेना शाखेसमोरील रिंगण आणि श्री मलंगनाथांच्या समाधी मंदिरासमोरील रिंगण हेही आकर्षण ठरले.

या सोहळ्याला श्री श्री महंत भाईनाथ महाराज, अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे कोकण प्रांत अध्यक्ष विश्वनाथ महाराज वारिंगे, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, तसेच राजकीय मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त श्री मलंगगडावर आणि गडाच्या पायथ्याशी तैनात केला होता.