लहान बाळांची नावे देवांची ठेवावीत; परंतु ती उच्चार करण्यास सोपी आणि सहज भावजागृती करून देणारी असावीत; कारण अवघड आणि अर्थ न समजणारी नावे ठेवली, तर भावजागृती होणे अवघड होते !
१. नावांमध्ये संबंधित देवतेचे केवढे तत्त्व आहे आणि हे नाव सर्वांना समजण्यास सुलभ आहे का, याचा विचार करा !
अ. ‘सध्या बरेच जण आपल्या मुलांना ‘आधुनिक’ वाटतील अशी देवांची नावे ठेवतात; पण ती नावे सर्वांना लगेच लक्षात येणारी नसतात, उदा. रेयांश. हे नाव जरी श्रीविष्णूच्या नावांपैकी एक असले, तरी त्यामुळे लगेच भावजागृती होत नाही; कारण सर्वांनाच त्याचा अर्थ ठाऊक असेल, असे नाही.
आ. थेट देवाचे नाव न ठेवता देवाशी संबंधित, पण थोडे ‘मॉडर्न’ वाटेल असेही नाव ठेवण्याचे ‘फॅड’ आले आहे. जसे ‘अयान’ हे श्री गणेशाचे एक नाव आहे. एखाद्या व्यक्तीला ‘अयान’ म्हणजे लगेच समजण्यास कठीण होऊ शकते.
बाळाचे नाव ठेवतांना ‘अशा नावांमध्ये त्या देवतेचे केवढे तत्त्व आहे आणि हे नाव सर्वांना समजण्यास सुलभ आहे का ?’, याचा विचार करायला हवा.
२. नावामागील शास्त्र जाणून ‘आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होईल’, असा विचार करून बाळाचे नाव ठेवणे अधिक उत्तम !
पूर्वी साधे, सरळ आणि सात्त्विक असे नाव ठेवत असत, उदा. राम, कृष्ण, लक्ष्मी, दुर्गा. देवतांची ही नावे लगेच लक्षात येणारी आहेत. त्यामुळे जे त्या नावाने बोलवतील, त्यांनाही देवाचे नाव लगेच समजून भाव ठेवण्यास साहाय्य होत असे.
अगदी असात्त्विक नावे ठेवण्यापेक्षा देवाशी संबंधित कोणतेही नाव ठेवले, तर चांगलेच आहे; पण ‘नावामागील शास्त्र जाणून आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होईल’, असा विचार करून बाळाचे नाव ठेवले, तर ते अधिक उत्तम आणि फलदायी ठरेल !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ