नगर – गोरक्षनाथांची तपोभूमी असलेल्या उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नाथ संमेलनात नगर शहरातील नाथ संप्रदायाचे संशोधक श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांना सलग दुसर्यांदा विशेष निमंत्रित वक्ता म्हणून सहभागी होण्याचा मान मिळाला. गोरक्षनाथ पीठाधिश्वर तथा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पावन उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन होताच मिलिंद चवंडके यांच्या बीज भाषणाने दोन दिवसांच्या संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. नाथ संमेलनाच्या मुख्य विषयावर झालेले हे बीज भाषण संमेलनातील लक्षणीय सहभागाची नोंद करणारे ठरले. ‘समरस समाज निर्मितीत नाथपंथाचे योगदान’ हा संमेलनाचा मुख्य विषय होता.
श्री. मिलिंद चवंडके यांनी लिहिलेली ‘श्री कानिफनाथ माहात्म्य’ ही मराठीतील रसाळ ओवीबद्ध पोथी त्यांनी स्वतः योगी आदित्यनाथांना दिली, तसेच पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा अंकही योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला.