प्रेमळ आणि उतारवयातही अध्यात्मप्रसाराची सेवा तळमळीने करणारे देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) शेखर इचलकरंजीकर (वय ७८ वर्षे) !

श्री. शेखर इचलकरंजीकर

१. श्री. राजेश रमाकांत निकम, दहिबाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.

१ अ. प्रेमभाव : ‘शेखर इचलकरंजीकरकाका स्वतःहून साधकांची विचारपूस करायचे. ते साधकांना स्वभावदोष-निर्मूलनासाठी स्वयंसूचना बनवून द्यायचे. काही साधकांच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना सेवा करण्यास मर्यादा येत असत. काका अशा साधकांना सेवेत साहाय्य करायचे.

१ आ. सेवेची तळमळ

१. काका देवगडमधील ६ फलकांवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण करायचे.

२. कोरोना महामारीच्या कालावधीत काकांनी ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून ‘ज्ञानशक्ती अभियाना’ची सेवा केली. त्यांनी त्यांच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना संपर्क करून सनातनच्या ग्रंथांचे वितरण केले, तसेच त्यांनी इतरही अनेक शाळांमध्ये सनातनच्या ग्रंथांचे मोठ्या प्रमाणात वितरण केले.

३. त्यांनी देवगड तालुक्यातील मंदिरे धर्मशिक्षण देणारी केंद्रे व्हावीत; म्हणून ‘धर्मशिक्षणवर्ग घेणे, मंदिरांमध्ये धर्मशिक्षण फलक लावण्यासाठी प्रायोजक मिळवणे’ इत्यादी सेवा केल्या.

१ इ. काकांनी स्वतःच्या व्यष्टी साधनेचा आढावा देण्यात कधीही खंड पडू दिला नाही.

१ ई. काकांना त्यांची चूक सांगितल्यावर ते लगेच चूक स्वीकारायचे आणि क्षमा मागायचे.’

२. श्री. भास्कर खाडिलकर (वय ६३ वर्षे), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग.

२ अ. प्रेमभाव : ‘सुखाचा किंवा दुःखाचा प्रसंग असो, काका समोरच्या व्यक्तीशी जवळच्या नातेवाइकाप्रमाणे संभाषण करत आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असत.

२ आ. काकांशी चर्चा केल्यानंतर माझ्या मनातील बर्‍याचशा शंकांचे निरसन होत असे. ते अट्टहास न करता ‘मला समजेल’, असे सांगत असत. त्यामुळे मी कृतीप्रवण होत असे.

२ इ. अध्यात्मप्रसाराची सेवा परिणामकारकरित्या करण्याचा प्रयत्न करणे

१. वर्ष २००० मध्ये मी काकांच्या समवेत गुरुपौर्णिमेसाठी अर्पण मिळवण्याची सेवा केली. अर्पण मिळवण्याच्या समवेत ‘अर्पणदार गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात सहभागी कसे होतील ?’, यासाठी काका तळमळीने प्रयत्न करत असत.

२. काका अध्यात्मप्रसाराच्या सेवेला गेल्यावर ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा साधनेतील सिद्धांत लक्षात ठेवून लोकांना साधनेकडे वळवण्याचा प्रयत्न करत असत. काका वेगवेगळ्या प्रार्थना आणि कृतज्ञता यांच्या प्रतींचे लॅमिनेशन करून त्या प्रती बर्‍याच जिज्ञासूंना वाटत असत, तसेच जिज्ञासूंचा ‘प्रार्थना आणि कृतज्ञता किती होतात ? त्या केल्याने काय जाणवले ? स्वतःत कोणते पालट झाले ?’, यांविषयीचा पाठपुरावा घेत असत.

२ ई. ते माझ्या गुणांचे कौतुक करत असत आणि मला माझ्यातील स्वभावदोषांची जाणीव करून देत असत.

२ उ. गुरूंप्रतीचा भाव : दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित झालेले लिखाण गुरुदेवांनी लिहिलेले आणि पाहिलेले असते अन् ते सत्यच असते’, असा काकांचा भाव असायचा.’

३. सौ. भाग्यश्री भास्कर खाडिलकर (वय ६२ वर्षे), देवगड

अ. ‘काकांच्या समवेत दुचाकी गाडीवरून अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी जातांना मला कधीही भीती वाटली नाही. ते नेहमी सावकाश आणि नियमांचे पालन करून गाडी चालवत असत.

आ. काकांनी वयाच्या ७८ व्या वर्षी ‘फेसबुक’, ‘व्हॉट्स ॲप’, ‘ट्विटर’ इत्यादी गोष्टी शिकून घेतल्या होत्या.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १३.९.२०२४)

शेखर इचलकरंजीकर रुग्णाईत असतांना त्यांची दृष्ट काढण्याच्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे !

श्री. केशव अष्टेकर

‘देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शेखर चंद्रकांत इचलकरंजीकर हे रुग्णाईत असल्याने त्यांना रुग्णालयातील अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले होते. ६.९.२०२४ या दिवशी मला त्यांची दृष्ट काढण्याचा निरोप मिळाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. मला दृष्ट काढण्याचा निरोप मिळल्यावर माझ्याकडून ‘ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ।।’, ही ज्ञानेश्वरीतील ओवी आपोआप म्हटली गेली. नंतर माझा ‘महाशून्य’, हा जप आपोआप चालू झाला.

२. मला दृष्ट काढण्याच्या निरोपाच्या समवेत काकांचे त्या वेळी काढलेले छायाचित्र पाठवण्यात आले होते. दृष्ट काढण्याच्या १ घंटा आधी मी काकांचे छायाचित्र पाहिले. तेव्हा मला त्यांच्या पायापासून मानेपर्यंत काही त्रास जाणवला नाही; पण त्यांचा चेहरा आणि डोके यांकडे पाहिल्यावर माझे डोके पुष्कळ जड झाले. त्या वेळी मला माझ्या डोक्याला मुंग्या आल्याप्रमाणे संवेदना जाणवल्या. तेव्हा माझे पाय जड झाले होते.

३. मी दृष्ट काढण्यापूर्वी मला माझे आज्ञाचक्र आणि विशुद्धचक्र यांच्या पाठीमागील बाजूस, तसेच स्वाधिष्ठानचक्रावर २ फूट जाडीचे वाईट शक्तीचे आवरण जाणवत होते. त्यामुळे मी स्वतःवरील वाईट शक्तीचे आवरण काढायचे ठरवले. ते आवरण काढण्यासाठी मला १८ मिनिटे लागली. त्यानंतर माझे शरीर हलके झाले.

४. सकाळी ११.३० वाजता मी काकांचे छायाचित्र एका पटलावर ठेवले आणि नारळाने त्यांच्या छायाचित्राची दृष्ट काढली. दृष्ट काढतांना आणि दृष्ट काढून झाल्यानंतर तिठ्यावर जाऊन नारळ फोडेपर्यंत माझे डोके जड झाले होते. नारळ फोडल्यानंतर मला हलके वाटले.

५. मी घरी आल्यावर हात-पाय धुतले आणि स्वतःभोवतालचे वाईट शक्तीचे आवरण काढले. तेव्हा मला त्रास जाणवला नाही.

६. त्यानंतर रात्री ८ वाजता मला काकांचे त्या वेळचे छायाचित्र पाठवण्यात आले आणि त्यांची पुन्हा दृष्ट काढण्यास सांगण्यात आले. त्या वेळी त्यांचे छायाचित्र पाहून ‘सकाळच्या तुलनेत त्यांचा त्रास न्यून झाला आहे’, असे मला जाणवले.

७. हे लिखाण करत असतांना माझे डोके जड झाले होते.’

– श्री. केशव अष्टेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६६ वर्षे), चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (१४.९.२०२४)