फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डि.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी केल्याचे प्रकरण
(‘डि.एन्.ए.’ (डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक)
पणजी, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती. या प्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रारी करण्याचे ३ ऑक्टोबर या दिवशी चालू झालेले सत्र ४ ऑक्टोबर या दिवशीही चालूच होते. ४ ऑक्टोबर या दिवशी शेकडो जणांनी मडगाव पोलीस ठाण्यासमोर एकत्र येऊन फ्रान्सिस झेवियर यांच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात प्रथमदर्शनी गुन्हा नोंदवण्याची मागणी मडगाव पोलिसांकडे केली. अशाच प्रकारे हरमल, पेडणे येथील ख्रिस्त्यांनी मांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन प्रा. वेलिंगकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. ३ ऑक्टोबर या दिवशी प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधात जुने गोवे, मडगाव आदी अनेक ठिकाणी पोलिसांत तक्रारी प्रविष्ट (दाखल) झालेल्या आहेत. प्रा. वेलिंगकर यांच्या विरोधात प्रविष्ट झालेल्या तक्रारींवर शासन कारवाई करणार असल्याची आशा पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी व्यक्त केली आहे.
मडगाव येथे तक्रार करण्यासाठी जमलेल्या जमावामध्ये आपचे आमदार क्रूझ सिल्वा, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो, सावियो कुतिन्हो आदींची उपस्थिती होती. या वेळी दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत आणि पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. आंदोलनकर्त्यांनी यानंतर जवळच्या एका रस्त्यावर एकत्र येऊन त्या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली.