Tirupati Laddu Case : अमेरिकेतील हिंदूंनी घेतले सामूहिक प्रायश्‍चित्त !

तिरुपतीच्या प्रसादातील चरबीयुक्त लाडूंचे प्रकरण

फ्रिस्को (टेक्सास) – अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फ्रिस्को शहरात २८ सप्टेंबर या दिवशी ‘ग्लोबल हिंदी हेरिटेज फाऊंडेशन’, ‘जन सेना’ आणि ‘विश्‍व हिंदु परिषद’ या संघटनांच्या सदस्यांनी शांतीमंत्र अन् ध्यानधारणा यांचे आयोजन केले होते. तिरुपती येथील भगवान श्री बालाजीला चरबीयुक्त लाडू अर्पण केले जात असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचे प्रायश्‍चित्त म्हणून शांतीमंत्र अन् ध्यानधारणा यांचे आयोजन करण्यात आले होते. आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी प्रायश्‍चित म्हणून ११ दिवसांचा उपवास केला होता. त्यातून प्रेरणा घेऊन अमेरिकेतील हिंदूंनी सामूहिक प्रायश्‍चित्त घेतले.

१. आरंभी शशी केजरीवाल यांनी भगवान बालाजीला अर्पण केलेल्या प्राण्यांच्या चरबीचा वापर करून प्रसाद बनवला गेल्याविषयी खेद व्यक्त केला.

२. त्यानंतर आर्.व्ही.व्ही.एस्.एस्. मंदिराच्या मुख्य पुजार्‍यांनी हिंदु भाविकांच्या मन आणि शरीर यांच्या शुद्धीसाठी शांतीमंत्रांचे पठण केले.

३. ‘ग्लोबल हिंदी हेरिटेज फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. प्रकाश राव वेलागापुडी यांनी तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि तेल यांचा वापर करणे, हे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावनांचे गंभीर उल्लंघन असल्याचे सांगितले.

४. ‘विश्‍व हिंदु परिषदे’चे  डलासचे अध्यक्ष श्री गौर, तसेच चंद्र कुसम, राहुल धरणकर, कमांडर गवी कुमार, सेवा इंटरनॅशनलचे सचिन सुगंधी, जन सेना पक्षाचे किशोर अनिचेट्टी, श्रीराम मथी, तेलुगु देसम पक्षाचे रामू गुलापल्ली, हेमंत काळे, रामकृष्ण जी.व्ही.एस्. यांनी या कार्यक्रमात त्यांचे विचार मांडले.

आंध्रप्रदेश सरकारला पाठवण्यात आले मंदिरांच्या रक्षणाच्या मागणीचे निवेदन

या कार्यक्रमात हिंदूंनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन आंध्रप्रदेश सरकारला पाठवले. या निवेदनात म्हटले आहे की,

१. हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणापासून मुक्त करा आणि त्यांचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम हिंदूंच्या कह्यात द्या.

२. हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांची चौकशी करा आणि अन्वेषण करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करा.

३. मंदिरांचा निधी इतर धर्म आणि धर्मनिरपेक्ष कृती, यांसाठी वळवणे थांबवा.

४. तिरुमला, तिरुपती आणि तिरुचानूर यांना ‘दिव्यक्षेत्र’, तसेच ‘पवित्र शहर’ म्हणून घोषित करा. हे व्हॅटिकन आणि मक्का यांसारखे धार्मिक केंद्र असावे.