सध्याच्या नवीन पिढीमध्ये ‘रॅप’च्या (पाश्चात्त्य संगीताचा एक प्रकार) माध्यमातून टीकाकारांना ‘टीझ’ (उपहासात्मक बोलणे) केले जाते. त्यामध्ये पैसा, गरिबी, नातेवाईक आणि समाजातील लोकांनी केलेली टीका असे संदर्भ असतात, म्हणजे ‘कुणी टीकाच करू नये’, अशी नवीन पिढीची अपेक्षा असते. ‘टीकेचा स्वतःच्या मनावर नकारात्मक परिणाम न होऊ देता त्याचे रूपांतर एका चांगल्या यशामध्ये कसे करू शकतो ?’, याची शिकवण आपल्या संतांनी आपल्याला दिली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणायचे, ‘निंदकाचे घर असावे शेजारी.’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांना समाजाने वाळीत टाकले, तरीही त्यांनी सर्वांना सामावून घेणारी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. संतांनी त्यांच्यावरील टीकेचा बाऊ केला नाही; पण कठीण किंवा विपरीत परिस्थितीत स्थिर आणि सकारात्मक कसे रहायचे, ते शिकवले. सध्याचे हे ‘रॅप’ ऐकून अनेक जण नैराश्यात जातात आणि आयुष्याची दिशा भरकटून घेतात.
नुकत्याच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अपंग स्पर्धकांनी चांगली कामगिरी बजावली. त्यांतील एकाने मुलाखतीत सांगितले की, आम्हाला समजातून पुष्कळ खालच्या स्तरावरील टीका सहन करावी लागली. त्याचे नातेवाईक म्हणायचे, ‘‘तू जगून काही अर्थ नाही, त्यापेक्षा मरण चांगले आहे’; पण त्यांचे अशा पद्धतीचे बोलणे हेच आमच्यासाठी प्रेरणा बनले आणि त्यातून मी अधिक कष्ट करून हे यश गाठू शकलो’’, असे त्याने सांगितले. कौतुकातून जितकी प्रगती होत नाही, त्याहून अधिक टीकेतून होते; पण ती टीका सकारात्मकतेने घेता आली पाहिजे. एखाद्याने तुमच्यावर टीका कधी सुधारणेच्या दृष्टीनेही केलेली असते. ती प्रत्येक वेळी तुम्हाला न्यून दाखवण्यासाठीच केलेली असते असे नाही; मात्र हे आजच्या पिढीला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. घरचे थोडे रागावले किंवा नातेवाइकांसमोर काही बोलले, तर लगेच अनेक जण नैराश्यात जातात. ऐकून घेणे किंवा समजून घेणे हे न्यूनतेचे लक्षण आहे; असे नवीन पिढीला वाटते. त्यामुळे टीकेकडे नकारात्मक दृष्टीने पहाण्याचा कल वाढला आहे.
एका शिल्पकाराकडे जेव्हा लोक यायचे, तेव्हा ते त्याच्या शिल्पाचे पुष्कळ कौतुक करायचे; पण त्याचे गुरु नेहमी त्यामध्ये सुधारणा सांगायचे, तेव्हा त्याला त्याचे वाईट वाटायचे. जेव्हा शिल्प परिपूर्ण झाले, तेव्हा त्याच्या गुरूंनी त्याला शाबासकी दिली आणि त्याचे कौतुक केले अन् सांगितले, ‘‘मी आरंभी तुझे कौतुक केले असते, तर हे परिपूर्ण शिल्प घडले नसते.’’ तेव्हा त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने त्याच्या चुकीची क्षमा मागितली. म्हणून निंदा किंवा टीका यांना शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा ती सकारात्मकतेने घेऊन स्वतःत योग्य तो पालट घडवावे आणि त्याचे रूपांतर चांगल्या यशामध्ये करावे, हेच श्रेयस्कर !
– श्री. जयेश बोरसे, पुणे