Nagaland Gau Dhwaj Yatra : नागालँड सरकारकडून ‘गो ध्वज स्थापना यात्रे’वर बंदी !

नागालँड सरकारने शंकराचार्यांना प्रवेश नाकारला !

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद (उजवीकडे)

दिमापूर (नागालँड) – गोहत्या रोखण्याची मागणी करणार्‍या ‘गो ध्वज स्थापना यात्रे’वर नागालँड सरकारने सार्वजनिक शांतता भंग होण्याचे कारण पुढे करत बंदी घातली.

दिमापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयाने हा आदेश दिला आहे. ही बंदी दिमापूर, चुमुकेडिमा आणि न्यूलँड या जिल्ह्यांत लागू आहे.

राजधानी कोहिमा येथे २८ सप्टेंबर या दिवशी होणार्‍या गो ध्वज यात्रेला अनेक नागा संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. देशव्यापी गोहत्या बंदीच्या समर्थनार्थ ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तथापि ही यात्रा या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक सौहार्दाला धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

मला का रोखले गेले ? – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

याआधी २५ सप्टेंबरला ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती हे नागालँडमधील गो ध्वज स्थापनेसाठी गेले असता, सरकारने त्यांना प्रवेश नाकारला. (आता याविषयी व्यक्तीस्वातंत्र्यवाले किंवा लोकशाहीवादी काही बोलत का नाहीत ? – संपादक) याविषयी शंकराचार्यांनी अपसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘मी कुणालाही हानी पोचवलेली नाही किंवा कुणालाही वाईट बोललो नाही. मला केवळ माझा संदेश लोकांपर्यंत पोचवायचा आहे. मला का रोखले गेले ? ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या दौर्‍यात अडथळा आणू नये. गोहत्या आणि गो संवर्धन यांच्याशी संबंधित त्यांना अडचणीच्या वाटणार्‍या सूत्रांवर ते चर्चा करू शकतात.’’

‘नागा स्टुडंट्स फेडरेशन’ने शंकराचार्याच्या प्रस्तावित भेटीचा निषेध केला आणि म्हटले की, हा नागा लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वंशाचा अपमान आहे. ही घटना नागा लोकांच्या परंपरा आणि धार्मिक प्रथांचे संरक्षण करणार्‍या राज्यघटनेच्या कलम ३७१ ए अंतर्गत दिलेल्या अधिकारांना आव्हान देते.

संपादकीय भूमिका

  • नागालँडमधील आघाडी सरकारमध्ये भाजप सहभागी असतांना अशी बंदी कशी घातली जाते ? हिंदूंना हे अपेक्षित नाही !
  • कुठले राज्य मुसलमानबहुल किंवा ख्रिस्तीबहुल झाल्यास काय होते ?, याचे हे उदाहरण आहे ! भारतात असे सर्वत्र होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !