पर्वरी (गोवा) : आझाद भवनमध्ये श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन

पणजी (गोवा) – ‘हेल्पफूल ऑर्गनायझेशन फॉर लाईक मांयडेड  इंडियन्स’(होली) आणि भारत तिबेट सहयोग मंच गोवा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पर्वरी येथील आझाद भवनमध्ये हिंदी भाषेतून संगीतमय श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात म्हणजे गुरुवार, ३ आक्टोबर ते बुधवार, ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे. या वेळी प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळी श्रीमद्भागवत या ग्रंथावर निरूपण होणार आहे.

३ ऑक्टोबर या दिवशी श्री भागवत माहात्म्य शुकदेव जन्म आणि परिक्षित जन्म; ४ ऑक्टोबला कपिल देवहूति संवाद आणि ध्रुव चरित्र; ५ ऑक्टोबरला अजामिल प्रसंग आणि प्रल्हाद चरित्र; ६ ऑक्टोबरला वामन अवतार, श्रीराम जन्म, श्रीकृष्ण जन्म; ७ ऑक्टोबरला बाललीला आणि गोवर्धन पूजा; ८ ऑक्टोबरला श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह आणि ९ ऑक्टोबर या दिवशी सुदामा चरित्र अन् परिक्षित मोक्ष या विषयांवर निरूपण करण्यात येणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२४ या दिवशी हवन आणि प्रसाद वितरण हा कार्यक्रम होणार आहे. गोव्यात हिंदीतून श्रीमद्भागवत कथा हा पहिलाच कार्यक्रम आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून कळवण्यात आले आहे.