पुण्यातील हुजूरपागा शाळेत झालेल्या ईदच्या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन स्वाक्षरी मोहीमे’द्वारे पाठिंबा देण्याचा प्रयत्न !

पुणे – येथील हुजूरपागा शाळेत नुकताच ईदनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसिद्ध शाळेत इस्लामीकरणाच्या या प्रयत्नाला हिंदुत्वनिष्ठ आणि नागरिक यांनी पुष्कळ विरोध केला होता. सामाजिक माध्यमांतही शाळेवर टीकेची झोड उठवण्यात आली होती; मात्र शाळेच्या ईदच्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी काहींनी change.org या संकेतस्थळावर एक ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. ‘लोकशाही उत्सव’ नावाच्या गटाने ही मोहीम चालू केली आहे, असे या संकेतस्थळाद्वारे दिसून येते.

याविषयी संकेतस्थळावर केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, ‘ईदनिमित्त आपल्या शाळेत मुलांमध्ये धार्मिक सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावाचे संस्कार रुजवण्याचे आपले कार्य कौतुकास्पद आहे. लहान वयापासूनच मुलांमध्ये विविध धर्म आणि संस्कृती यांचा आदर करण्याची शिकवण देणे, ही काळाची आवश्यकता आहे. आपल्या शाळेत मुलांना सर्व धर्मांचा आदर करण्यासाठी प्रेमचंदांच्या ईदगाह कथेवर आधारित नाटिका करून कल्पक उपक्रम आयोजित केल्याविषयी आपले अभिनंदन. अशा सकारात्मक प्रयत्नाला संकुचित विचार असलेल्यांकडून विरोध झाला, त्यासाठी आम्हाला खेद आहे. देशाच्या राज्यघटनेची मूल्ये रुजवण्याचा आपल्या कार्याला आमचा मन:पूर्वक पाठिंबा आहे.’

काय आहे प्रकरण ?

पुण्यातील लक्ष्मी रस्ता येथील ‘महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी’च्या कै. सौ. अश्‍विनी अरुण देवस्थळे पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या हुजूरपागा शाळेत ईद-ए-मिलाद साजरी करण्यात आली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता अनकाईकर यांनी या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रेमचंद यांची ईदगाह ही कथा सांगण्यात आली. यासाठी एक नाटिका बसवण्यात आली. सर्वांनी एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या आणि शीरखुर्मा खाल्ला.

संपादकीय भूमिका

  • शाळेत श्री सरस्वतीदेवीचे छायाचित्र लावण्यावर बंदी घालणारा शिक्षण विभाग शाळेत साजर्‍या करण्यात येणार्‍या ईदच्या कार्यक्रमाविषयी चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !
  • शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याच्या प्रस्तावावरून ‘शिक्षणाचे भगवेकरण केले जात आहे’, अशी टीका करणारे पुरोगामी, नास्तिकतावादी, साम्यवादी आदी आता ईदचा कार्यक्रम आयोजित केल्यावर ‘शिक्षणाचे इस्लामीकरण होत आहे’, असे म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • मुसलमानांच्या शाळांमध्ये आणि मदरशांत कधी गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव साजरा केल्याचे ऐकले आहे का ?