हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गात गेल्‍यावर केवळ ६ मासांत साधकात जाणवलेले पालट आणि त्‍याला आलेल्‍या अनुभूती

‘मी वर्ष २०२३ च्‍या सप्‍टेंबरपासून हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गात जाण्‍यास प्रारंभ केला. मला केवळ ६ मासांतच माझ्‍यात पालट जाणवले आणि अनुभूती आल्‍या. त्‍या येथे दिल्‍या आहेत.

श्री. राजीव कांबळे

१. साधकाच्‍या जीवनातील पूर्वीची स्‍थिती

‘पूर्वी मी एका मासात ५ वेळा देवाचे उपवास करत असे. मंदिरात जाऊन पूजा करत असे; परंतु माझ्‍या मनाप्रमाणे काहीच घडायचे नाही. मला सतत मानसिक त्रास आणि पैशाची अडचण असे. त्‍यामुळे मी चिडून उपवास, देवपूजा करणे आणि मंदिरात जाणेे सर्व सोडून दिले; तरीही माझ्‍या अडचणी सुटल्‍या नाहीत.

२. हिंदु जनजागृती समितीच्‍या अंतर्गत घेतल्‍या जाणार्‍या धर्मशिक्षणवर्गाला जाण्‍यास प्रारंभ करणे

काही दिवसांनी मला हिंदु जनजागृती समितीकडून एका हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे निमंत्रण मिळाले. मी त्‍या सभेला गेलो. तिथे ‘महिलाही हिंदूंना जागृत करण्‍याचे कार्य करत आहेत’, हे मला आवडले. नंतर मी हिंदु जनजागृती समितीच्‍या एका साधकाच्‍या संपर्कात राहिलो. हिंदु जनजागृती समितीमध्‍ये धर्मशिक्षणसुद्धा दिले जाते, हे मला समजले. त्‍यानंतर मी धर्मशिक्षणवर्गाला जाण्‍यास प्रारंभ केला.

३. धर्मशिक्षणवर्गात गेल्‍यावर कुलदेवी आणि दत्तगुरु यांचा प्रतिदिन नामजप चालू करणे अन् हिंदु धर्माविषयी अधिक माहिती समजणे

मला धर्मशिक्षणवर्गात हिंदु देवता आणि धर्म यांविषयी अधिक माहिती मिळाली. धर्मशिक्षणवर्गामध्‍ये मला कुलदेवी आणि दत्तगुरु यांचा नामजप करायला सांगितला. त्‍यानंतर मी प्रतिदिन नामजप करण्‍यास आरंभ केला आणि पुन्‍हा मंदिरात जाऊ लागलो. मला आरंभीच्‍या केवळ ६ मासांत धर्माविषयी पहिल्‍यापेक्षा अधिक माहिती समजली.

४. त्‍यानंतर मीही एका साधकाच्‍या साहाय्‍याने धर्मशिक्षणवर्ग घेण्‍यास आरंभ केला.

५. वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवेची संधी मिळणे

रामनाथी आश्रम, म्‍हणजे जणू काही स्‍वर्गच ! साक्षात् वैकुंठ दर्शन ! तिथे आम्‍ही काही साधकांनी १० दिवस सेवा केली. तो सेवेतील आनंद घेऊन आम्‍ही सोलापूर येथे परत आलो.

६. साधकात जाणवलेले पालट आणि आलेल्‍या अनुभूती

अ. मी घरी आल्‍यापासून घरातील काम करतांना रामनाथी आश्रमातील केलेली सेवा मला आठवते.

आ. पूर्वी मी जेव्‍हा निसर्गाकडे बघायचो, तेव्‍हा मला काही विशेष वाटत नव्‍हते; परंतु आता ‘फुलेे, पाने, झाडे आणि आकाश हे हसत आहेत’, असे मला जाणवते. जग सुंदर वाटायला लागले आहे.

इ. आता मला राग येत नसून माझी चिडचिडही होत नाही.

ई. प.पू. गुरुदेव ‘माझ्‍या समवेत सतत आहेत’, असे मला जाणवते.

उ. मला काही अडचण आल्‍यास मी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करतो. त्‍यामुळे माझ्‍या अडचणी काही क्षणात दूर झाल्‍याचे मला अनुभवता येत आहे.

‘हे गुरुदेवा, ‘(परात्‍पर गुरु डॉ. आठवले) आपल्‍या कृपेने माझ्‍या जीवनात मला आनंद मिळत आहे’, याबद्दल मी श्री गुरुचरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. राजीव यमनादास कांबळे, सोलापूर (८.८.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक