१. भेटला मज श्रीहरि हो ।
‘एकदा मी श्रीकृष्णाशी बोलत होते. मी श्रीकृष्णाच्या अनुसंधानात आणि आनंदात होते. मी आश्रम स्वच्छतेच्या सेवेला जात असतांना मला पू. नरुटे आबा यांंचे दर्शन झाले. त्यांना पाहून मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली भेटल्याची अनुभूती आली. त्या वेळी मला पुढील काव्ये सुचली.
भेटला मज श्रीहरि हो । आनंदले मन माझे ॥
विरघळले अनेक पाश । स्वभावदोेष नि अहं सह ॥
हरपले भान माझे हो । भेटला मज श्रीहरि हो ॥ १ ॥
घटले आवरण हो । दर्शनाने तयाच्या ॥
तुषार गंगा गंध मधुर । दृष्टी अलौकीक हो ॥
हरपले भान माझे हो । भेटला मज श्रीहरि हो ॥ २ ॥
प्रकाशमान दिव्यत्व हो । अलंकारांनी जणू नटली मूर्ती ॥
विसरले देहभान हो । केवळ उरले अद्वैत ॥
क्षणात् झाला चमत्कार । भेटला मज श्रीहरि हो ॥ ३ ॥
२. ओळखणे तुझे अमृततुल्य ।
१०.१०.२०२४ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज देहत्यागापूर्वी ज्या खोलीत रहात त्या खोलीत बसून मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना आत्मनिवेदन करत होते. माझे मन रिकामे होऊन माझा भाव जागृत झाला आणि मला पुष्कळ आनंद मिळत होता. त्या वेळी मला खोलीसमोर पू. नरुटे आबा फेर्या मारत असलेले दिसले. त्यांनी मला बोलावले. तेव्हा मला त्यांचे दर्शन झाले. मला त्यांच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच दिसत होती. त्यांच्या दर्शनाने मला पुष्कळ ऊर्जा आणि चैतन्य मिळाले. ‘माझा भगवंत माझ्या जवळच आहे’, याची मला प्रचीती आली आणि माझा भाव जागृत झाला. त्या भावावस्थेत सुचलेले काव्य त्यांच्या चरणी अर्पण करते.’
ओळखलेस रे दयाळा । कसे फेडू तुझे पांग ॥
तू आहेस माझा प्राणसखा । कशाची न्यूनता न केलीस कधी ॥ १ ॥
हे मनोरमा वर्णू कशी रे लीला तुझी । शब्दही थिटे असती ॥
अमर्याद पुरुषोत्तमा । ओळखणे तुझे ही साक्ष तुझी ॥ २ ॥
हृदयी सर्व आकांक्षा तृप्त करी । भगवंता मनोरमा वात्सल्यमूर्ती तू ॥
तुझ्या दर्शनाने केलेस निश्चिंत । तुझे असणे समवेत जे असणे सर्वकाही ॥ ३ ॥
श्रीहरि माझा तू मनमोहना । विठुराया तृप्ती होई तुझ्या दर्शनाने ॥
अमर्याद पुरुषोत्तमा । ओळखणे तुझे अमृततुल्य ॥ ४ ॥
– सुश्री (कु.) मनीषा शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१०.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |