मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?

‘आमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?’ किंवा ‘आमच्या मुलांचा सर्दी, खोकला पटकन बरा का होत नाही ?’, हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. सर्दी, खोकला आणि औषधांच्या दुकानात जाऊन एखादे ‘कफ सिरप’ किंवा मनानेच बनवलेले एखादे चाटण अथवा काढा देणे, हे समीकरण जनमानसांत इतके खोलवर रुजले आहे. खोकला ओला आहे कि कोरडा ?, ढास लागते की पटकन थांबतो, कफ सुटतो का कि पुष्कळ खोकल्यावर थोडासा कफ येतो ?, पोटात ‘गॅस’ (वायू) आहे का ?, पोट कसे साफ होते ? आपल्या मुलांना पित्त तर झाले नाही ना ? ताप गेल्यावर आलेला कोरडा खोकला आहे का ? या प्रत्येक विचारागणिक औषध पालटते. त्यामुळे ऐकून वा बघून घरगुती उपाय करत रहाण्यापेक्षा वैद्यांचा सल्ला घेतल्यावर पटकन बरे वाटतेच आणि वारंवारताही न्यून होते.

१. कफाचा त्रास वाढण्यामागील कारणे

खाली काही कारणे देत असून त्यापैकी आपल्या मुलांना असे काही घडत नाही ना, हेही पहावे.

१. आपल्या मुलाचा खोकला कोरडा आणि ढासयुक्त असता औषधांच्या दुकानात जाऊन एखादे ‘कफ सिरप’ घेऊ नये. त्याने कोरड्या खोकल्याची उबळ वाढू शकते. भरपूर मध चाटवत राहू नये, त्यामुळे कोरडेपणा वाढतो. कोरड्या खोकल्याची ढास असता चुरमुरे, विविध उसळ, मध इतर वातुळ पदार्थ खाणे टाळावे.

२. दही, उडीद, फळे, चीज हे पदार्थ प्रतिदिन किंवा सारखे खायला देऊ नये. यामुळे कफ वाढतो आणि शरिरात कफासंबंधीचे आजार व्हायला पोषक वातावरण सिद्ध होते.

३. आंबट, खारट, तिखट हे पदार्थ अधिक प्रमाणात असल्यास लहान मुलांनाही पित्त होऊ शकते. त्यामुळे कोरडा खोकल्याचे लक्षण दिसू शकते.

वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये

४. जर तुम्ही रहात असलेला भाग हा पाणी अधिक असणारा; दमट हवेचा असेल, तर घरामध्ये धूपन करण्याचा लाभ होतो. अशा ठिकाणी कफाचे त्रास अधिक असल्याने उन्हाच्या ऋतूमधून थंडीच्या ऋतूमध्ये जातांना कफनाशक औषधे, काही विशिष्ट मसाले पदार्थ खाण्यात वापरावेत. सूत्र क्र. २ आणि ३ मध्ये सांगितलेले पदार्थ टाळावेत.

५. मुलांमध्ये गोड खायची इच्छा अधिक असणे, शिंका, पोटफुगी, अंग गळून जाणे, वारंवार ताप, अशी लक्षणे ही आयुर्वेदानुसार ‘कृमी’ (जंत) रोगाची लक्षणे असू शकतात. त्या निदानाला अनुसरून औषधे दिली असता वारंवार सर्दी, खोकला, ताप प्रवृत्ती न्यून होत जाते.

६. ‘कोविड’ महामारीची साथ आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणानंतर विषाणूंमध्ये सतत होत जाणारे पालट अन् त्यामागून येणार्‍या मोठमोठ्या साथी हे अपरिहार्य आहेत. त्यांना तोंड देण्यासाठी आयुर्वेदातील ‘रसायना’विषयी वैद्यांना अवश्य विचारावे. सरसकट सगळ्या आजारांवर च्यवनप्राश हे एकच रसायन नाही.

२. आयुर्वेद औषधांचा लाभ

आयुर्वेद औषधे ही रोग झाला असतांना रोग न्यून करण्यासाठी उपयुक्त आहेतच, तसेच रोग वारंवार होऊ नये, यासाठी शरिरातील तो आजार होण्यासाठी जे दोष वा कारणे आहेत, त्यांना आटोक्यात ठेवायला साहाय्य करतात. यामुळे रोग वारंवार होण्याची प्रकृती न्यून होते. त्यामुळे शरिरात तो रोग वाढायला पोषक वातावरण मिळत नाही. यामुळे आपोआप पुढचे पुढचे संसर्ग आणि त्याची तीव्रता न्यून होत जाते.

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.


चांगल्या आरोग्यासाठीची लक्षणे !

सतत दक्ष किंवा शरीर देत असलेल्या सूचनांकडे लक्ष ठेवणे, ही आरोग्यासाठी महत्त्वाची पायरी आहे. पुढील गोष्टी होकारार्थी असल्यास त्या अधिक काळ प्रकृतीपूर्ण ठेवण्यास साहाय्य करतात. यातील लक्षणांत पालट होऊ लागला किंवा वेगळी काही लक्षणे दिसायला लागली, तर वेळीच सल्ला घेणे चांगले !

१. प्रतिदिन पोट साफ होते का ? कसे होते ?

२. रात्री शांत झोप लागते का ?

३. सकाळी उठल्यावर प्रसन्न आणि उत्साही वाटते का ?

४. जीभ स्वच्छ असते का ? दातावर कीटण आहे का ?

५. जेवल्यावर साधारण २ घंट्याने पोटात आणि कुशीत हलकेपणा जाणवतो का ?

६. वास नसलेली ढेकर येते का ?

७. नाकाने वास, जीभेला चव, डोळ्याला दृष्टी, त्वचेला स्पर्श आणि कानाला ऐकू येते का ?

८. कधीतरी वेडेवाकडे खाण्यात आले किंवा दिनक्रम पालटला, तरी तुम्ही नीट असता का ?

९. तुमचे वजन आटोक्यात आहे का ?

१०. तुम्ही प्रतिदिन व्यायाम करता का ?

११. पाळी नियमित येते का ?

जन्मजात बीजदोषानुसार एखाद्या व्यक्तीचा कल हा एखाद्या त्रासाकडे असू शकतो. अशा परिस्थितीत शरिराचा समतोल राखण्याचे काम आणि प्रकृतीला योग्य दिनचर्या, ऋतूचर्या अन् औषधे हे आयुर्वेद करू शकते. आताचे साथीचे रोग, पालटते जिवाणूंचे प्रकार आणि त्यापुढे तोकडे पडणारे वैद्यकीय ज्ञान हे बघता शरीर उत्तम ठेवणे, हे सगळ्यातून तरून जायला साहाय्यकारक होईल !

– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये