श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराची स्वच्छता आणि रंगरंगोटी !

देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

मंदिर परिसरात असलेल्या विविध मंदिरांच्या शिखरांची रंगरंगोटी चालू असतांना

तुळजापूर – ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाच्या वतीने मंदिराची स्वच्छता करण्यात येत आहे, तसेच मुख्य मंदिरासह विविध शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. २४ सप्टेंबरला सायंकाळी देवीची मंचकी निद्रेला प्रारंभ झाला. यानंतर ३ ऑक्टोबरला पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन दुपारी १२ वाजता घटस्थापना होईल. यानंतर १८ ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सध्या पितृपक्ष चालू असल्याने भाविकांची संख्या मर्यादित आहे. ही संख्या नवरात्रीत दीड लाखांपासून ५ ते ६ लाखांपर्यंत जाते.

महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या दर्शनासाठी नवरात्रात मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने शहराच्या विविध भागांत वाहनतळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांसाठी बाहेरच्या बाजूला मंडप घालण्यात येणार असून येणार्‍या भाविकांसाठी २४ घंटे प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी १५० हून अधिक कर्मचारी त्या कालावधीत स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत, अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

लवकरच आंध्रप्रदेशातील श्री बालाजी देवस्थानच्या धर्तीवर ५० ग्रॅमचे दोन बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून देण्याचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे. यामुळे भाविकांना पंढरपूर आणि श्री बालाजी यांच्याप्रमाणे प्रसाद म्हणून लाडू मिळतील. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर त्याचे काम चालू होईल. लाडूत काजू-मनुकाही घालण्यात येणार आहेत, अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.