काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरील सुनावणी आता विशेष न्यायालयात होणार !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचे प्रकरण

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीची फौजदारी तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. आता या तक्रारीची सुनावणी ‘एम्.पी.एम्.एल्.ए.’ या विशेष न्यायालयामध्ये होणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांच्या विरोधातील तक्रारीची सुनावणी विशेष न्यायालयात घेण्याचा आदेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांनी लंडन येथे अनिवासी भारतियांसमोर केलेल्या भाषणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात वादग्रस्त विधाने केली होती. त्यावर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयामध्ये गांधी यांच्या विरोधात फौजदारी मानहानीचा दावा प्रविष्ट (दाखल) केला आहे. राहुल गांधी यांनी समक्ष उपस्थित राहून स्वत:चे म्हणणे मांडण्याचा आदेश देण्यात आला होता. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑक्टोबरला होणार आहे.

‘एम्.पी.एम्.एल्.ए.’ न्यायालय म्हणजे काय ?

कोणत्याही जिल्ह्यातील खासदार आणि आमदार यांच्या विरोधात फौजदारी संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि पुनराविलोकन याचिका अंतर्गत प्रविष्ट (दाखल) सर्व दावे विशेष न्यायालयामध्ये चालवले जातील, अशी अधिसूचना उच्च न्यायालयाने प्रसारित केली होती. त्यानुसार या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष न्यायालयात सर्व आजी, माजी, सर्व खासदार आणि आमदार यांच्यावरील फौजदारी खटले चालवले जाणार आहेत.