बीड, नांदेड आणि हिमाचल प्रदेश येथील गणेश मंदिरांची वैशिष्ट्ये !

सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष…

नवगणपति राजुरी, बीड

नवगण राजुरी (जी. बीड) येथील प्रसिध्द श्रीगणेश मूर्ती

हे देवस्थान नवगण राजुरी (जिल्हा बीड) येथे आहे. हे पेशवाई थाटाचे मंदिर आहे. येथे एका चौकोनी दगडाच्या चारही दिशांना गणपति आहेत. त्यांची नावे पूर्वेकडील ‘महामंगल’, दक्षिणेकडील ‘मयुरेश्वर’, पश्चिमेकडील ‘शेषब्धिष्ठित’ आणि उत्तरेकडील ‘उत्तिष्ठ गणेश’, अशी आहेत. प्रत्येक मूर्ती अनुमाने ३ – ४ फूट उंच आहे. मूर्तीसमोरच गणपतीकडे मुख करून बसलेला दगडी मूषक (उंदीर) आहे.


विज्ञानगणेश, राक्षसभुवन, बीड

हे गणेशस्थान बीड जिल्ह्यात असून ते जालना स्थानकाच्या पश्चिमेला ६० कि.मी. दूरवर आहे. ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी सती अनुसयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याचे ठरवून ब्राह्मणरूपात ते अतिथी धर्मानुसार त्यांचे स्वागत केले, तेव्हा त्या तिघांनी तिला इच्छाभोजन देण्याची याचना केली आणि विवस्त्र होऊन भोजन देण्याची प्रार्थना केली. अनुसयेने पतीचे स्मरण करून त्या तिघांवर तीर्थ शिंपडले. तत्क्षणी त्या तिघांचे बालकांमध्ये रूपांतर झाले आणि तिने त्यांना स्तनपान करवले. अशा रितीने तिने आपले पातिव्रत्य अबाधित राखले आणि अतिथी धर्माचेही पालन केले. दत्तात्रेयांनी विज्ञानगणेश या नावाने येथे गणपतीची स्थापना केली. त्यानंतर त्रिभुवनात भ्रमण करत विज्ञानाचा प्रसार केला.

हे मंदिर ‘बाग’ भागात गावाबाहेर गोदावरी नदीच्या तीरावर आहे. विज्ञानगणेशाची मूर्ती सध्या असलेल्या ठिकाणाखाली एका गुहेमध्ये होती. सुमारे २०० वर्षांपूर्वी शंकरबुवा मंगलमूर्ती यांनी ती बाहेर काढली. पत्नीशापातून मुक्त होण्यासाठी सूर्यपुत्र शनीनेही याच ठिकाणी श्री गणेशाची उपासना केली होती. त्यामुळे शनीचे ‘राक्षसभुवन’ म्हणूनच हे क्षेत्र अधिक प्रसिद्ध आहे.


साधू महाराजांचा गणपति, कंधार, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील कंधार गावाच्या पश्चिमेला अनुमाने दीड कि.मी. दूर हे मंदिर येते. ही मूर्ती महाकाय, लंबोदर, गजकर्णक आहे. हे मंदिर कंधार गावाच्या सीमेवर असल्याने त्याला ‘शिवेवरचा गणपति’ असेही म्हणतात.

कंधार येथील शिवेवरचा गणपति

मराठवाडा-विदर्भ भागातील एक संतपुरुष श्री साधूमहाराज आषाढी वारीसाठी पंढरपूरला जात असतांना त्यांनी शेकापूर गावी मुक्काम ठोकला. गणपतीने त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन ‘आपण मन्याड नदीच्या उत्तरतिरी भूमीत वर्षानुवर्षे असून तेथून बाहेर काढ’, असा आदेश दिला. महाराजांनी ही गोष्ट शेकापूरवासियांच्या कानी घातली. गावकर्‍यांनी महाराजांनी दर्शवलेल्या स्थानी खणण्यास प्रारंभ केला. तेथे गणेशमूर्ती सापडली; परंतु ती जागेवरून हाललीच नाही. महाराजांनी मूर्तीला स्पर्श करताच ती शेजारी बांधलेल्या पारावर स्थानापन्न झाली; म्हणून या गणपतीला ‘साधू महाराजांचा गणपति’ असे नाव पडले.


षड्भुज गणेश, वैजनाथ, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याच्या वैजनाथ गावी एक प्राचीन शिवालय आहे. शिवालयात प्रवेश करतांना दोन्ही बाजूंना दोन मूर्ती आहेत. त्यापैकी एक मारुतीची, तर दुसरी गणपतीची गणेशमूर्ती षड्भुज असून ती अत्यंत आकर्षक आहे. मागील दोन्हीकडच्या दोन हातांत परशु आणि अंकुश आहे. डावीकडच्या दोन हातांपैकी एकात तुटलेला दात आणि मांडीवर रूळणार्‍या सोंडेच्या तोंडाजवळ नेलेल्या हातात मोदक आहे. उजवीकडच्या दोन हातांपैकी खालच्या दिशेने केलेल्या हातात कमलपुष्प आणि मांडीवर आशीर्वाद देत असलेला हात आहे.

लेखक : कृष्णाजी कोटी