प्रथम इतिहास पक्का करण्याची आवश्यकता ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

डोंबिवली येथे ‘गांधीहत्या – एक ऐतिहासिक मिमांसा’ या पुस्तकाचे प्रकाशन

श्री. भाऊ तोरसेकर

ठाणे, ८ सप्टेंबर (वार्ता.) –  इतिहासाच्या भूमीवरच वर्तमान उभे असते आणि इतिहास पक्का असेल, तरच वर्तमानाची भूमी भविष्यात आकाशात झेपावू शकते; पण आमचा इतिहासच कच्चा आहे. प्रथम तोच इतिहास पक्का करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी येथे केले.

‘पै फ्रेंड्स लायब्ररी’ आणि ‘चित्पावन ब्राह्मण संघ, डोंबिवली’ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रा. पराग वैद्य लिखित ‘गांधीहत्या – एक ऐतिहासिक मिमांसा’ या पुस्तकाचे प्रकाशन तोरसेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मिहाना प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, चित्पावन ब्राह्मण संघ डोंबिवलीचे कार्याध्यक्ष माधव घुले, लेखक प्रा. वैद्य व्यासपिठावर उपस्थित होते.

तोरसेकर पुढे म्हणाले की, इतिहास समजून घेण्यासाठी प्रवृत्त करणे महत्त्वाचे आहे. आपल्याला जे पटले नाही, ते सत्य कि असत्य आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. गांधीवधाच्या घटनेनंतर २५ वर्षांनी ज्यांचा जन्म झाला, त्या लेखक वैद्य यांना गांधीहत्येचे सत्यशोधन करावे, असे वाटत असेल, तर सत्य हे संपत नाही, असेच म्हणावे लागेल. सत्य कुणी नाकारू शकत नाही, संपवू शकत नाही, ते आपला पाठलाग करत मागे येतेच. स्वातंत्र्यवीर सावरकर, नथुराम गोडसे आणि हिंदुत्वाच्या विरोधात जे बोलतात त्यांना प्रत्युत्तर देणारे हे पुस्तक आहे. सत्य, संदर्भ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावा.

लेखक वैद्य यांनी १२ वर्षे वाचन, संशोधन करून, आवश्यक ते संदर्भ, पुरावे देऊन या पुस्तकाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांसाठी पुष्कळ मोठे काम केले आहे. यामुळे किती खरे आणि किती खोटे? हे जाणून घेता येणार आहे. कुणी सांगावे उद्या सावरकर आणि गोडसे यांचे पुतळे उभे करण्याची वेळ येईल, असेही तोरसेकर यांनी सांगितले.

पुस्तकामुळे समाजात नक्कीच जागरूकता निर्माण होईल ! – पराग वैद्य, लेखक

लेखक पराग वैद्य मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, १ सहस्र ४८६ पानांचे हे संपूर्ण पुस्तक भ्रमणभाषवर लिहिले आहे. गांधींचे चरित्र, गांधी हत्या कृती, गांधी हत्या अभियोग आणि गांधी हत्येचे परिणाम अशा चार भागांत हे पुस्तक असून लेखक म्हणून मी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. पुस्तकात देण्यात आलेले संदर्भ, पुरावे आणि संपूर्ण पुस्तक वाचून वाचकांनी त्यांना काय वाटते ? ते ठरवावे. पुस्तकामुळे समाजात नक्कीच जागरूकता निर्माण होईल, असे वाटते.