सशस्त्र दलांनी युद्धासाठी सिद्ध रहावे ! – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारत एक शांतताप्रिय राष्ट्र आहे. शांतता टिकवून ठेवण्यासाठी सशस्त्र दलांनी युद्धासाठी सिद्ध असणे आवश्यक आहे, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. ते पहिल्या ‘जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स’मधील ‘सशक्त आणि सुरक्षित भारत, सशस्त्र दलांचे परिवर्तन’ या विषयावर बोलत होते.

सध्या चालू असलेल्या जागतिक संघर्षांचा संदर्भ देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, जागतिक अस्थिरता असूनही भारतात शांतता आहे; मात्र सध्या वाढत असलेल्या आव्हानांमुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या वर्तमानावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, आपल्या सभोवतालच्या घडामोडींवर लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्याभिमुख होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्याकडे भक्कम राष्ट्रीय सुरक्षा धोरण असायला हवे.