२३.८.२०२४ या दिवशी चिंचवड (पुणे) येथील साधिका सुश्री उज्ज्वला ढवळे यांचे वडील प्रभाकर दामोदर ढवळे (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. ५.९.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १४ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात झालेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. सौ. अलका रवींद्र डंबाळ (कै. प्रभाकर ढवळे यांची मोठी मुलगी, वय ६५ वर्षे), इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.
अ. ‘अण्णांचा साखरेच्या विक्रीचा व्यवसाय होता. व्यवसाय करतांना कुणाची अधिक रक्कम आल्यास ते त्या व्यक्तीला बोलावून तिचे पैसे परत द्यायचे.
आ. अण्णांनी गावातील प्रत्येकाला जोडून ठेवले होते. गावातील सर्व जण त्यांची नेहमी विचारपूस करायचे.
इ. फुलगाव (पुणे) येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी अण्णांना अनुग्रह दिला होता. अण्णांनी आमच्यावर केलेल्या संस्कारांमुळे आज आम्ही साधना करत आहोत.’
२. सुश्री उज्ज्वला ढवळे (कै. प्रभाकर ढवळे यांची धाकटी मुलगी), चिंचवड, पुणे.
२ अ. व्यवस्थितपणा : ‘अण्णांच्या हिशोबाच्या नोंदी व्यवस्थित लिहिलेल्या असत. ते अधिकोषात रक्कम भरण्यापूर्वी सर्व नोटा एकसारख्या लावत असत. त्यांचे दुकानातील सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलेले असे. अण्णा कपडे वाळत घालतांना त्यांची टोके व्यवस्थित जुळवत असत.
२ आ. ते कधीच अन्न वाया घालवत नसत. जेवढे आवश्यक असेल, तेवढे अन्न ते वाढून घेत असत. त्यांना जेवणाविषयी आवड-नावड नव्हती.
२ इ. अण्णा त्यांची सर्व कामे ठरलेल्या वेळेतच करत असत. कुठे जायचे असेल, तर ते ठरलेल्या वेळेपूर्वी तेथे जात असत.
२ ई. अण्णांच्या मनात कुणाबद्दल कधीच कटूता नव्हती. त्यांना राग आला, तरी ते लगेच विसरून जात असत.
२ उ. व्यवसायातील बारकावे सांगून त्यांनी अनेकांना व्यवसाय करण्यासाठी साहाय्य केले.
२ ऊ. त्यांच्या मनात ‘आपल्यामुळे अन्य कुणाला त्रास व्हायला नको’, असा विचार असायचा.
२ ए. अण्णांना दोन वेळा पक्षाघाताचा सौम्य झटका आला होता. तेव्हापासून ते ८ वर्षे एका खोलीत आहेत; पण त्यांनी त्याविषयी कधीच कोणतेही गार्हाणे केले नाही.
२ ऐ. व्यवसाय करतांना अण्णांचे पैसे बुडाले, तरीही ते निराश झाले नाहीत.
२ ओ. अण्णांना कोणतीही आसक्ती नव्हती. त्यांच्याकडे पाहून ‘ते विरक्त झाले आहेत’, असे मला जाणवायचे.
२ औ. अण्णा पूर्वी श्रीमद्भगवद्गीता वाचायचे. त्यानंतर त्यांना जशी आठवण होईल, तसा ते नामजप करायचे.
२ अं. ‘मुलगी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असून योग्य मार्गावर आहे’, याची निश्चिती झाल्यावर काळजी दूर होणे : पूर्वी ‘मी एकटी रहाते’, याची आई आणि अण्णा यांना काळजी वाटायची. ते साधकांना भेटल्यावर ‘मुलगी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असून योग्य मार्गावर आहे’, याविषयी त्यांची निश्चिती झाली. माझ्या घरी आल्यावर घर पाहूनही ते निश्चिंत झाले. नंतर त्यांनी माझी काळजी करणे सोडून दिले.’
३. सौ. मीना ढवळे (कै. प्रभाकर ढवळे यांची सून), चिंचवड, पुणे.
३ अ. अण्णांमध्ये जाणवलेले पालट
१. ‘अण्णा पुष्कळ शांत असायचे.
२. ‘त्यांचे मन निर्मळ झाले आहे’, असे मला जाणवायचे.
३. ते कुणाकडून कोणतीही अपेक्षा करत नसत.
४. ते कुणाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करत नसत.
५. अण्णांची स्वीकारण्याची वृत्ती वाढली होती.’
३ आ. अण्णांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. ‘निधन झाल्यानंतर साधक आणि कुटुंबीय यांना ‘अण्णा शांत झोपले आहेत’, असे वाटत होते.
२. वातावरणात हलकेपणा जाणवत होता आणि शांत वाटत होते.
३. माझा दत्तगुरूंचा नामजप चालू होता. प्रार्थना केल्यावर ‘गुरुमाऊली सर्वकाही पहात आहे’, असे मला वाटले. तेव्हा मला दत्तगुरूंचे दर्शन झाले.
४. ‘श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरत आहे’, असे दृश्य मला दिसत होते. मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
५. आमच्याकडे काकस्पर्श विधी निधनानंतरच्या तिसर्या दिवशी करतात. हा विधी झाल्यावर काही सेकंदांतच पुष्कळ कावळे आले आणि त्यांनी सर्व पदार्थांना स्पर्श केला.
६. अण्णांच्या निधनानंतर २ दिवस साधकांनी आमच्या जेवणाची व्यवस्था केली आणि अन्य साहाय्यही केले. या संदर्भात आम्ही आमच्या कुटुंबियांना सांगितले. तेव्हा त्यांनी साधकांचे कौतुक केले.
‘हे गुरुदेवा, ‘जीवनाच्या शेवटपर्यंत अण्णांना सर्वांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटायची. त्यांनी परिस्थिती मनापासून स्वीकारली. ‘अण्णांचे सर्व गुण माझ्यातही यावेत’, अशी मी गुरुमाऊलीच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.८.२०२४)
अनासक्त आणि रुग्णाईत असूनही सतत सकारात्मक असणारे चिंचवड (पुणे) येथील कै. प्रभाकर दामोदर ढवळे (वय ८५ वर्षे) !
सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक या प्रभाकर ढवळेकाका यांना भेटायला त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्या वेळी पू. (सौ.) मनीषा पाठक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘प्रभाकर ढवळेकाका पुष्कळ काळापासून रुग्णाईत असूनही सकारात्मक होते.
२. आजारपण किंवा परिस्थिती यांविषयी त्यांचे कोणतेही गार्हाणे नव्हते.
३. त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता.
४. ‘काका कुटुंबियांमध्ये अडकले नव्हते’, असे माझ्या लक्षात आले.’
– पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४२ वर्षे), पुणे (२५.८.२०२४)
पू. (सौ.) मनीषा पाठक वडिलांना भेटण्यासाठी घरी आल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !
‘माझे वडील प्रभाकर ढवळे (अण्णा) हे रुग्णाईत असतांना पू. (सौ.) मनीषा पाठक मला भ्रमणभाष करत असत. भ्रमणभाष केल्यावर पू. मनीषाताई सर्वप्रथम माझ्या वडिलांची प्रेमाने विचारपूस करायच्या, तसेच त्यांच्या त्रासाच्या तीव्रतेनुसार उपायही कळवायच्या. त्यानंतर त्या अण्णांना भेटायला घरी आल्या होत्या. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. पू. मनीषाताई घरी आल्यावर ‘प.पू. गुरुदेवच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच) आले आहेत’, असे मला वाटत असे.
२. २१.८.२०२४ या दिवशी पू. मनीषाताई अण्णांना भेटायला घरी आल्या होत्या. अण्णांनी पू. ताईंना हात जोडून नमस्कार केला. त्या बोलत असतांना अण्णाही प्रतिसाद देत होते.
३. पू. ताईंनी त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे लिहून देण्यास सांगितले. त्याप्रमाणे लिखाण करून अण्णांचे छायाचित्र काढले. नंतर २३.८.२०२४ या दिवशी अण्णांचे निधन झाले.’
– सुश्री उज्ज्वला ढवळे, चिंचवड, पुणे (२५.८.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |