मुंबई, ३ सप्टेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत १ लाख १० सहस्र प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रूजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे. यांतील ६० सहस्रांहून अधिक युवक-युवती राज्यातील खासगी आणि शासकीय संस्था यांमध्ये प्रशिक्षणासाठी रूजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत २ लाख २१ सहस्र २४४ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली आहे. राज्यातील ८ सहस्र १७० आस्थापनांनीही यामध्ये नोंदणी केली आहे. या आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींना संधी देण्यात येणार आहे. या योजनेतून महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती होईल.’’