Kerala Congress : केरळमधील काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचे शोषण होते ! – काँग्रेसच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन

  • काँग्रेसच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांचा आरोप

  • ज्येष्ठ नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच संधी मिळत असल्याचा आरोप

सिमी रोजबेल जॉन

थिरूवनंतपूरम् (केरळ) – चित्रपटांसारखी ‘कास्टिंग काऊच’ची (चित्रपटात काम मिळण्यासाठी होणारे शोषण) परिस्थिती केरळ काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच पक्षात पुढे जाण्याची संधी मिळते, असे आरोप केरळमधील काँग्रेसच्या नेत्या सिमी रोजबेल जॉन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. सिमी यांच्या या आरोपांनंतर केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एम्. लिजू यांनी एक निवेदन प्रसारित करत सिमी रोजबेल जॉन यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याची घोषणा केली.

सिमी रोजबेल जॉन यांनी काँग्रेसवर केलेले आरोप !

१. महिलांचे सर्वच क्षेत्रांत, अगदी कामाच्या ठिकाणी आणि राजकारणातही शोषण होत आहे. पक्षातील अनेक सहकारी महिलांनी त्यांचे वाईट अनुभव मला सांगितले आहेत.

२. मी केरळमधील काँग्रेसच्या महिला नेत्यांना सल्ला देते की, नेत्यांना भेटायला एकट्या जाऊ नका. तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना समवेत घेऊन जा. माझ्याकडे पुरावे आहेत, जे योग्य वेळी समोर येतील.

३. केरळ काँग्रेसमध्ये संधी मिळण्यासाठी महिला नेत्या आणि कार्यकर्ते यांनी शोषणाला सामोरे जाण्यास सिद्ध रहावे.

मला काहीही होऊ शकते ! – सिमी रोजबेल जॉन

काँग्रेसच्या आरोपांवर सिमी यांनी कोचीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा लतिका सुभाष, के. करुणाकरन् यांची मुलगी पद्मजा वेणुगोपाल यांनाही बाहेर काढण्यात आले. स्वाभिमान असलेल्या महिला काँग्रेसमध्ये काम करू शकत नाहीत. मलाही काढून टाकण्यात आले. महिलांचा आवाज बनून मी चूक केली. मला आता बाहेर फिरायलाही भीती वाटते. मला काहीही होऊ शकते.

सिमी यांचे आरोप निराधार ! – काँग्रेस

केरळमधील काँग्रेसचे प्रमुख के. सुधाकरन् म्हणाले की, महिला काँग्रेसने सिमी रोजबेल जॉन यांच्या आरोपांविरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. सिमी यांचे आरोप निराधार आहेत.

संपादकीय भूमिका

गांधीवादी आणि अहिंसावादी काँग्रेसमधील हुकूमशाही ! लोकशाहीरक्षणाच्या गप्पा मारणार्‍या काँग्रेसची ही वस्तूस्थिती मांडणार्‍या महिलेच्या मागे महिला संघटना उभ्या रहातील का ?