महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक !
मुंबई – राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या ‘विद्यार्थी आत्महत्या : भारतात पसरलेली महामारी’ (स्टुडंट सुसाईड्स : अॅन एपिडेमिक स्विपिंग इंडिया)हा अहवाल २८ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार वर्ष २०२२ मध्ये भारतामध्ये एकूण १३ सहस्र ४४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १ सहस्र ७६४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
या अहवालानुसार महाराष्ट्राच्या खालोखाल तामिळनाडूमध्ये १ सहस्र ४१६, मध्यप्रदेशमध्ये १ सहस्र ३४०, उत्तरप्रदेशमध्ये १ सहस्र ६०, तर झारखंडमध्ये ८२४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. भारतातील विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येच्या तुलनेत महाराष्ट्रातील आत्महत्येचे प्रमाण ११ टक्के इतके आहे. वर्ष २०२१ मध्ये भारतात एकूण १३ सहस्र ८९ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे. वर्ष २०२१ मध्ये देशात एकूण १ लाख ६४ सहस्र ३३, तर वर्ष २०२२ मध्ये भारतात १ लाख ७० सहस्र ९२४ आत्महत्यांची नोंद झाली आहे. वर्ष २०२१ च्या तुलनेत आत्महत्येच्या संख्येत ४.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील एक तृतीयांश विद्यार्थ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश या राज्यांत होत आहेत. राजस्थानमधील कोटा शहरामध्ये देशभरातून विद्यार्थी शिकवणीसाठी येतात, त्या कोटा शहरात वर्ष २०२२ मध्ये ५७१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे.
संपादकीय भूमिकाचांगले जीवन जगण्यासाठी केवळ गुण आणि पैसा देणारे स्पर्धात्मक पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी धर्माचरण शिकवून आत्मबळ वाढवणारी भारतीय शिक्षणप्रणालीच आवश्यक आहे ! |