…अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी रस्त्यावर उतरतील ! – संतभूमी संरक्षक संघर्ष समिती

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी साधना केलेल्या भामचंद्र आणि भंडारा डोंगरावर अतिक्रमण

संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर

मुंबई – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी ज्या भामचंद्र आणि भंडारा या डोंगरांवर साधना केली, त्या तपोभूमीवर विकासक आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी अतिक्रमण केले आहे. वर्ष २०११ मध्ये हे दोन्ही डोंगर पुरातत्व विभागाने ‘राज्य संरक्षित स्मारके’ म्हणून घोषित केले होते; मात्र त्यानंतरही या डोंगरांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत सरकारने हे डोंगर संरक्षित स्मारक असल्याचा अध्यादेश कायम असल्याविषयीची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. मधुसूदन पाटील यांनी दिली. २८ ऑगस्ट या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या वेळी कार्याध्यक्ष माधवी माने, समन्वयक राजीव इनामदार, जनसंपर्क अधिकारी अनिता कडू, संघटक अश्विनी ताढेगावकर, सचिव कुमार सुरवसे, ह.भ.प. फाले महाराज, ह.भ.प. नीलेशशास्त्री महाराज आदी उपस्थित होते.

या वेळी मधुसूदन पाटील म्हणाले, ‘‘भंडारा आणि भामचंद्र डोंगर या संरक्षित स्मारकांविषयी वर्ष २०१२ मध्ये अध्यादेशात सुधारणा करून या संरक्षित स्मारकांवरील भूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे; मात्र हा सुधारित अध्यादेश अद्यापही लागू करण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच भंडारा डोंगरावर सपाटीकरण आणि खाणकाम चालू आहे. तहसीलदारांनी या प्रकरणी विकासकांवर दंड आकारला आहे; मात्र तरीही हे काम चालू आहे. भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे प्राचीन मंदिरही सुधारणेच्या नावाखाली तोडण्यात आले आहे. या तपोभूमीचा व्यावसायिक वापर चालू आहे. या संरक्षित स्मारकांचे सुधारित प्रस्ताव सांस्कृतिक विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. या तपोभूमीवरील अतिक्रमण वारकरी कदापि सहन करणार नाहीत.’’

संपादकीय भूमिका

व्यावसायिक वापरासाठी तपोभूमीवरील अतिक्रमण मागे घेण्यासाठी वारकर्‍यांना प्रयत्न करावे लागणे हे प्रशासनाला लज्जास्पद !