पुणे येथील दक्ष माहिती अधिकार कार्यकर्त्याने उघड केला घोटाळा !
पुणे – जवळपास ४०० अधिकार्यांनी फसवणूक करून बोगस अपंगत्व प्रमाणपत्रे सादर करत ‘क्लास वन’ सरकारी अधिकारीपदे बळकावल्याचा आरोप शहरातील श्री. महेश बडे या दक्ष माहिती अधिकार (आर्.टी.आय.) कार्यकर्त्याने केला आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांचा गट आणि विद्यार्थी संघटनांचे सदस्य यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचा चुकीचा वापर करून सरकारी नोकर्या मिळवून फसवणूक करणार्या वर्ग एकच्या कर्मचार्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आक्रमक मोहीम चालू केली. या मोहिमेची गांभीर्याने नोंद घेऊन या प्रकरणी चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभाग आणि अपंग कल्याण विभागातील वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत.
ज्यांनी प्रशासकीय यंत्रणेची फसवणूक करून नोकरी मिळवली आहे, अशांच्या चौकशीचे आदेश तर देण्यात आले आहेतच; पण अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून सरकारी पदे बळकावणार्या दोषींना शिक्षा ठोठावण्याचेही आदेश दिले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते महेश बडे म्हणाले की, बनावट अपंग प्रमाणपत्राद्वारे व्यवस्थेची कशी सहजपणे फसवणूक करता येते, याचे ताजे उदाहरण म्हणजे पूजा खेडकर ! आमच्या या मोहिमेद्वारे व्यवस्थेवर भ्रष्टाचाराच्या चढलेल्या गंजाचा थर हटवण्यास थोडेसे साहाय्य झाले आहे. आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांनी आता अपंग कल्याण आयुक्तांना संबंधित अधिकार्यांच्या सर्व नोंदी आणि संबंधित दस्तावेजांची शहानिशा करण्याचे आदेश दिले आहेत.
संपादकीय भूमिकाजमा केलेली बोगस प्रमाणपत्रे लक्षात कशी येत नाहीत ? बोगस प्रमाणपत्र देणारे, घेणारे आणि प्रमाणपत्र पडताळणारे सर्वांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक ! माहिती अधिकार कार्यकर्त्याने घोटाळा उघड केला नसता, तर आणखी शेकडो अधिकार्यांनी बोगस प्रमाणपत्रे मिळवली असती ! |