सोनगिरी आणि मीरगड हे दोन्ही स्वतंत्र गड आहेत ! – राज मेमाणे, इतिहास संशोधक

पेशवे दप्तरातील कागदपत्रांच्या संशोधनातून सिद्ध…

मीरगड

पुणे – मीरगड म्हणजे मृगगड असून हा गड तत्कालीन सरसगड होता. सध्या हा गड पाली तालुक्यात आहे. दुसरा गड सोनगिरी हा तत्कालीन अवचितगड तालुक्यात होता. सध्या तो पेण तालुक्यात आहे. पेण तालुक्यातील सोनगिरीचा गड म्हणजे मीरगड होय, अशी आजपर्यंत समजूत होती. ही पूर्णपणे चुकीची आहे. सोनगिरी आणि मीरगड हे दोन्ही स्वतंत्र गड आहेत. याविषयी पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरांतील मोडी भाषेतील कागदपत्रांमधून सिद्ध होत आहे. असे इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी स्पष्ट केले. ‘भारतीय विचार साधना सभागृहा’मध्ये त्यांनी संशोधन सादर केले. त्या वेळी विविध कागदपत्रे, गडांच्या छायाचित्रांचे सादरीकरण करत याची माहिती दिली.

या दोन्ही गडांचा सर्वांत जुना उल्लेख हा वर्ष १७३९ च्या कागदपत्रांमध्ये आढळून येतो. पुढे वर्ष १७३९ ते १७९२ या काळात हे दोन्ही गड दुर्लक्षित झाले. त्यानंतर अवचितगड तालुक्यांतील हबश्यांकडून (जंजिरातील सिद्धी लोक) उपद्रव व्हायला लागला. म्हणून दोन्ही गड पुन्हा वसवावेत, असे अवचितगडाचे तत्कालीन मामलेदार सरदार बाबूराव पासलकर यांनी पेशव्यांना कळवल्याचा स्पष्ट उल्लेख या दप्तरांमध्ये आढळून आला आहे. त्यानंतर पेशव्यांच्या आज्ञेवरून हे दोन्ही गड वर्ष १७९३ च्या चैत्र महिन्यात पुन्हा नव्याने वसवण्यात आले असल्याचे या दोन्ही गडांच्या बांधकामांच्या कागदपत्रांतून स्पष्ट झाले आहे.

इतिहास संशोधक राज मेमाणे म्हणाले की, पेशवे दप्तरांत सोनगिरी आणि मीरगड या दोन्ही गडांचे दोन वेगवेगळे कागद सापडले आहेत. या कागदपत्रांतून हे दोन्ही गड एकच नसून वेगवेगळे असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे. त्यामुळे पूर्वीचा दावा चुकीचा होता.