Muhammad Yunus : चीनमधील सौर पॅनेलचे कारखाने बांगलादेशात स्‍थलांतरित करा ! – महंमद युनूस

बांगलादेशातील आंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांची चीनच्‍या राजदूतांकडे मागणी !

डावीकडून चीनचे राजदूत याओ वेन आणि महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी चीनचे राजदूत याओ वेन यांची भेट घेतली. या वेळी युनूस यांनी ‘चिनी उत्‍पादक बांगलादेशामध्‍ये सौर पॅनेलचे कारखाने स्‍थलांतरित करू शकतात, ज्‍यामुळे बांगलादेशाला निर्यातीत विविधता आणण्‍यास आणि हरित ऊर्जा विकसित करण्‍यास साहाय्‍य होईल’, अशी मागणी केली.

१. दोन्‍ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढवण्‍यासाठी चीनला बांगलादेशी वस्‍तूंची आयात वाढवण्‍याची आवश्‍यकताही महंमद युनूस यांनी व्‍यक्‍त केली. भेटीमध्‍ये युनूस यांनी बीजिंग आणि ढाका यांच्‍यातील घनिष्‍ठ आर्थिक सहकार्याचे आवाहन केलेे.

२. युनूस म्‍हणाले की, चीन सौर पॅनेलचा सर्वांत मोठा उत्‍पादक म्‍हणून उदयास आला आहे; परंतु देशाला निर्यात बाजारात निर्बंधांचा सामना करावा लागतो. सौर औष्‍णिक उर्जेसाठी चीन ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे.

३. चीनचे राजदूत याओ वेन युनूस या वेळी म्‍हणाले की, युनूस यांच्‍या नेतृत्‍वाखाली बांगलादेशाचे भविष्‍य उज्‍ज्‍वल होईल. तसेच म्‍यानमारच्‍या हिंसाचारग्रस्‍त राखीन राज्‍यात युद्धविरामासह रोहिंग्‍यांच्‍या संकटावर कायमस्‍वरूपी तोडगा काढण्‍यासाठी चीन कटीबद्ध आहे.

४. बांगलादेशात रहाणार्‍या १० लाखांहून अधिक रोहिंग्‍या लोकांना चीन राजकीय, आर्थिक आणि मानवतावादी साहाय्‍य देत राहील, अशी आशा युनूस यांनी व्‍यक्‍त केली.

संपादकीय भूमिका

बांगलादेश आता चीनचा बटिक होणार, हेच यातून स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे भविष्‍यात चीन बांगलादेशाच्‍या खांद्यावर बंदुक ठेवून भारताच्‍या विरोधात कारवाया करणार, हेही स्‍पष्‍ट आहे. बांगलादेशात हस्‍तक्षेप न केल्‍याचे फळ भारताला पुढे भोगावेच लागणार आहे !