‘वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाबद्दल बरेच काही वाचायला मिळत होते. त्यात वडाचा एक अद्भुत प्रकार ज्ञात झाला, तो म्हणजे ‘कृष्णवड’ ! पहिल्यांदा वाचल्यावर वाटले, ‘ज्याप्रमाणे काळ्या तुळशीला ‘कृष्णतुळस’ म्हणतात, त्याप्रमाणे या वडाची पाने काळी असावीत; म्हणून याला ‘कृष्णवड’ म्हणत असतील.’ नंतर कळले, ‘या वडाची पाने देठाकडच्या बाजूने आत वळलेली आणि द्रोणासारखी असतात अन् त्यामागे कृष्णाची एक पौराणिक कथा आहे; म्हणून याला ‘कृष्णवड’ नाव पडले.’ भारतीय संस्कृतीकोशात पुढील कथा वाचनात आली.
एकदा गोपाळकृष्ण गायींना घेऊन रानात गेला असता काही गोपी लोणी घेऊन तिथे गेल्या. त्यांनी कृष्णाला ते लोणी दिले. कृष्णाने सर्व गोप-गोपींना ते लोणी वाटले. त्यासाठी त्याने जवळच असलेल्या एका वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून घेतली. तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोणासारखी बनली आणि त्याच्या बिजापासून उत्पन्न झालेल्या वडाला तशीच पाने येऊ लागली; म्हणून या वडाला ‘कृष्णवड’, असे म्हणतात.
काही वनस्पती-अभ्यासकांकडून आणि संकेतस्थळावरून अशी माहिती मिळाली की, मुंबईच्या जिजामाता उद्यानात अन् पुण्यात ‘एक्सप्रेस गार्डन’मध्ये हा वृक्ष आहे. विशेषतः बंगाल प्रांतात हा वृक्ष आढळतो. या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘Ficus krishnae’, असे आहे. पूर्वी ही साध्या वडाचीच (Ficus benghalensis चीच) एक उपप्रजाती मानली जात होती; मात्र केवळ याची पानेच नव्हे, तर या वृक्षाची वाढ, त्याच्या मुळांची रचना, पारंब्या, या सगळ्यांमध्ये अल्प-अधिक फरक असल्याने अलीकडे ही स्वतंत्र प्रजाती म्हणून गणली जाऊ लागली आहे. याला ‘माखनकटोरा’, असेही एक गोड नाव आहे.’
(सौजन्य : संकेतस्थळ)