कीव (युक्रेन) – युक्रेनने रशियाच्या सेराटोव्ह येथे ३८ मजली निवासी इमारत ‘व्होल्गा स्काय’वर ड्रोनद्वारे आक्रमण केले. वर्ष २००१ मध्ये अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या २ इमारतींवर जिहादी आतंकवाद्यांनी ज्या प्रमाणे विमाने धडकावून आक्रमण केले, तसेच युक्रेनने या इमारतीवर ड्रोन धडकावले; मात्र या आक्रमणात आतापर्यंत केवळ २ जण घायाळ झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या २० हून अधिक वाहनांची हानी झाली आहे. युक्रेन सीमेपासून सेराटोव्हचे अंतर ९०० कि.मी. आहे.
युक्रेनकडून या वेळी रशियावर २० ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. यांपैकी सर्वाधिक ९ सेराटोव्हमध्ये आक्रमण करण्यात आले. याविषयी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियाने साराटोव्हमध्ये युक्रेनचे ९ ड्रोन पाडले आहेत.
रशियाने युक्रेनवरील आक्रमण केले तीव्र !
रशियाने २६ ऑगस्टच्या पहाटे कीव आणि युक्रेनच्या अन्य शहरांवर आक्रमण केले. रशियाच्या सैन्याने कीव येथे मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली. तसेच ड्रोनद्वारेही गोळीबार आणि बाँबफेक करण्यात आली.
युक्रेनने रशियावर केलेले आक्रमण अमेरिका आणि युरोप यांना महागात पडेल !अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ या दिवशी ‘विश्व व्यापार केंद्रा’च्या इमारतीवर जसे आक्रमण झाले, त्याची आठवण करून देणारे हे आक्रमण आहे. युक्रेनकडे असे अत्याधुनिक ड्रोन कुठून आले ? उत्तर आहे अमेरिका ! हा संघर्ष कोण पेटवत आहे ? त्याचे उत्तर आहे अमेरिका आणि ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक सुरक्षा संघटना) ! रशिया-युक्रेन संघर्ष हा खर्या अर्थाने रशिया आणि अमेरिकापुरस्कृत ‘नाटो’मधील संघर्ष आहे. म्हणूनच तो २ वर्षांपासून चालू आहे. अशा आक्रमणांनी रशिया अधिक असुरक्षित होणार आणि कदाचित् आण्विक क्षेपणास्त्राने याचे प्रत्युत्तर देईल, जे युरोपला महागात जाईल. हा संघर्ष वाढवून युरोपला काय साध्य होणार आहे ? आधीच युरोप याची मोठी किंमत चुकवत आहे. हे अमेरिकेलाही महागात जाणार; कारण या युद्धाने चीन आणि रशिया यांना जवळ आणले आहे, जे अमेरिकेसाठी धोक्याचे आहे. त्यामुळे हा प्रश्न शांतता आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवला जावा, ही भारताची भूमिकाच योग्य आहे. – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक, पुणे. (२६.८.२०२४) |