नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच राज्यात फोडाफोडी आणि जातीयवादाचे राजकारण शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चालू केले. जातीपातींत विष कालवण्याचे काम त्यांनी चालू केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात केव्हाच महापुरुष आणि संत यांची जातीपातींत विभागणी झाली नव्हती; पण वर्ष १९९९ नंतर असे घडण्यास प्रारंभ झाला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी केला. येथे २४ ऑगस्ट या दिवशी रविभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुसलमान आणि दलित यांनी ठाकरे आणि पवार यांच्यासाठी मतदान केले नाही !
ते म्हणाले की, पुरोगामी लोकशाही दलाच्या स्थापनेपासून हा प्रकार चालू झाला. त्यांनी गणेश नाईक, नारायण राणे, छगन भुजबळ असे अनेक नेते फोडले. मागच्या ५ वर्षांत राज्यात ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला, त्याला लोक कंटाळले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने ४०० पारची घोषणा दिली, तसेच राज्यघटना पालटण्याची घोषणा दिल्यामुळे मुसलमान आणि दलित समाज यांनी एकगठ्ठा मतदान केले. हे मतदान काही उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासाठी नव्हते. ५ वर्षांपूर्वी मतदारांसमवेत जी प्रतारणा झाली, ती लोक विसरलेले नाहीत. या गोष्टींचा राग विधानसभेच्या निवडणुकीला नक्की काढतील.
मुली-महिला यांवरील न थांबणारे अत्याचार ही सत्ताधार्यांसाठी शरमेची गोष्ट !
बदलापूर येथे मुलींवरील अत्याचारांची घटना आमच्या कार्यकर्त्यांनी समोर आणली. या घटनेनंतर अशा अनेक घटना समोर आल्या. गत काही वर्षांत सरकारने महिला सुरक्षेशी संबंधित अनेक योजना आणल्या. कोट्यवधी रुपये व्यय केले; पण त्यानंतरही महिलांशी संबंधित अत्याचाराच्या घटनांत घट झाली नाही. ही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठीही शरमेची गोष्ट आहे. या घटनांमुळे देशातील प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्राची तुलना उत्तरप्रदेश आणि बिहार यांच्यासमवेत केली जात आहे.