साधकाच्या मनात अपघाताचे विचार येणे आणि त्या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली नामजपादी उपायांच्या संदर्भातील सूचना वाचल्यानंतर साधकाला त्याच्या मनात अपघाताचे विचार येण्यामागील कार्यकारणभाव समजणे

श्री. महेंद्र सहस्रबुद्धे

१. स्वतःच्या अपघाताविषयीचे विचार मनात येणे आणि तसे दृश्यही दिसणे

‘माझ्या मनात ‘माझा अपघात झाला आहे. अपघातात माझे हात आणि पाय यांचा अस्थिभंग झाला आहे. मला विश्रांती घ्यावी लागत असल्यामुळे मला सेवा करता येत नाही’, असे विचार येत होते. माझ्या मनात असे विचार काही आठवड्यांपूर्वी दिवसभरात ३ – ४ वेळा येत होते. मला सूक्ष्मातून ‘मी रुग्णालयात उपचार घेत आहे’, असे दृश्यही दिसत होते; मात्र ‘माझ्या मनात असे विचार अकस्मात् का येत आहेत ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. माझ्या मनात हे विचार केवळ १० ते १२ सेकंद टिकत होते. त्यामुळे नंतर मी ते विसरून जात होतो. मला त्या विचारांचा विसर पडत असल्यामुळे ‘माझ्या मनात असे विचार का येत आहेत ?’, याविषयी माझे कुणाशीही बोलणे झाले नाही.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘साधकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले असणे आणि त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी शोधलेले नामजपादी उपाय’ या संदर्भात छापून येणे

६.८.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये नामजपादी उपायांसंदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी लिहिलेली सूचना प्रसिद्ध झाली. त्यामध्ये ‘वाईट शक्ती साधना आणि समष्टी सेवा करणार्‍या साधकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. वाईट शक्तींचा साधकांना त्रास देण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांतील एक प्रकार, म्हणजे काही दिवसांपासून साधकांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे’, अशा आशयाचे लिखाण प्रसिद्ध झाले होते. हे वाचल्यानंतर माझ्या मनात अपघाताचे विचार येण्यामागील कार्यकारणभाव मला समजला.

३. कृतज्ञता

‘परात्पर गुरुमाऊलींच्याच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने हे माझ्या लक्षात आले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘हे गुरुमाऊली, आपल्या कृपेनेच त्रासाविषयीचे विचार मला ग्रहण करता आले; मात्र त्याविषयी मला सतर्क रहाता येऊन त्यावर उपाय करण्याच्या संदर्भातील प्रयत्न आणि कृती माझ्याकडून करून घ्या’, ही आपल्या कोमल चरणी प्रार्थना !’

– श्री. महेंद्र यशवंत सहस्रबुद्धे , सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.८.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक