PM Modi On Russia-Ukraine war : आम्ही तटस्थ नाही, तर शांततेच्या पक्षासमवेत ! – पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये घेतली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची भेट

पंतप्रधान मोदी (डावीकडे) आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

कीव (युक्रेन) – युद्धाची भीषणता मन हेलावते. युद्ध मुलांसाठी विनाशकारी आहे. भारत युद्धाविषयी कधीही तटस्थ किंवा निष्पक्ष राहिलेला नाही. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना भेटल्यावरही आम्ही हेच सांगितले होते. युद्धाने प्रश्‍न सुटत नाही. संवाद आणि मुत्सद्देगिरी यांद्वारे प्रश्‍न सोडवले जातात. दोन्ही पक्षांनी एकमेकांशी बोलणे चालू केले पाहिजे. रशिया-युक्रेन यांनी वेळ न घालवता चर्चा करावी. शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतल्यावर त्यांना सांगितले. दोन्ही नेत्यांनी कीव येथील मारिन्स्की पॅलेसमध्ये सुमारे ३ घंटे द्विपक्षीय बैठक घेतली. चर्चेमध्ये बहुतेक वेळा युक्रेन संकटावर चर्चा झाली. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या ७ घंट्यांच्या कालावधीसाठी रशिया आणि युक्रेन यांनी युद्ध थांबवले होते.

मोदी पुढे म्हणाले की, आजचा दिवस भारत आणि युक्रेन यांच्यासाठी ऐतिहासिक आहे. भारत आणि युक्रेन यांच्यामध्ये ४ करार झाले आहेत. दोन्ही देशांनी मानवतावादी साहाय्य, कृषी, वैद्यकीय आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवण्याचे मान्य केले आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी पोलंडची राजधानी वॉर्सा येथून १० घंटे रेल्वे प्रवास करून कीव येथे पोचले. येथे त्यांचे भारतीय वंशांच्या लोकांनी स्वागत केले. यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

पाहुण्यांना मिठी मारणे भारताची संस्कृती ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

येथे पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांना पत्रकारांनी ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची गळाभेट घेतल्याबद्दल झेलेंस्की यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती का ? यावर भारताची भूमिका काय आहे ?’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर डॉ. जयशंकर म्हणाले की, एखाद्याला भेटल्यावर मिठी मारणे तुमच्या संस्कृतीत असू शकत नाही; पण तो आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे.

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याविषयी राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली आहे. झेलेंस्की यांच्यासमोर भारताने स्वतःची भूमिका मांडली आणि बाजाराची स्थिती स्पष्ट केली. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाच्या अंतर्गत कोणत्याही देशाची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व राखण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.

पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍यामुळे रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात येण्यास साहाय्य होईल ! – संयुक्त राष्ट्रे

पंतप्रधान मोदी यांच्या युक्रेन भेटीमुळे रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये चालू असलेले युद्ध संपुष्टात येईल, अशी आशा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे.

युक्रेनला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान !

युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून ‘नाटो’ देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नेत्याने युक्रेनला भेट दिलेली नाही. ‘नाटो’ ही ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना आहे.