‘रक्षक सिक्युरिटी आस्थापना’च्या कर्मचार्यांची सेवा समाप्तीची कारवाई, तर आस्थापनाला ‘कारणे दाखवा’ नोटीस !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – दिनांक १८ ऑगस्ट या दिवशी ठाणे येथील भाविक चेतन रविकांत काबाडे हे श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येथे आले होते. या वेळी सुमित संभाजी शिंदे या व्यक्तीने संबंधित भाविकांकडून ४ सहस्र रुपये ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेतले आणि संत ज्ञानेश्वर दर्शनमंडपातून दर्शनास सोडले. संबंधित भाविकास पैसे भरल्याची पावती न मिळाल्याने त्यांना स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी रितसर तक्रार नोंदवल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे सुमित शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. दर्शनमंडप प्रवेशद्वारावरील ‘रक्षक सिक्युरिटी आस्थापना’चे कर्मचारी अभिजित रघुनाथ मंडळे आणि शुभम शामराव मेटकरी या दोन्ही कंत्राटी कर्मचार्यांनी विनाअनुमती दर्शनास सोडल्याने त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे; तर ‘रक्षक सिक्युरीटी सर्व्हिसेस अॅण्ड सिस्टम्स प्रा.लि. पुणे’ या आस्थापनाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
२. सुमित शिंदे याच्या भ्रमणभाषचे ‘सीडीआर्’ (भ्रमणभाषमधील अन्य लोकांना संपर्क केल्याचा तपशील) काढण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून चालू आहे. त्याला कुणाकडून पैसे आले ?, ते त्याने पुढे कुणाला दिले ? त्यानंतर त्याचा कुणाकुणाशी संपर्क झाला ? त्याचा प्रतिदिन मंदिर समितीतील कुणाकुणाशी संपर्क असतो ? तसेच मंदिर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पहाण्याचे कामही पोलीस प्रशासनाकडून चालू आहे.
भाविकांनी पदस्पर्श दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये !
या प्रकारानंतर मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दर्शन हे संपूर्णत: निशुल्क आहे. त्यामुळे भाविक-भक्तांनी कुणासही पदस्पर्श दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये.
संपादकीय भूमिकामंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असणे आवश्यक आहे ! |