मद्यधुंद चारचाकी चालकाने तिघांना दिली धडक

  • जुन्या मांडवी पुलावरील घटना

  • १ ठार, तर २ जण गंभीररित्या घायाळ

पणजी, २२ ऑगस्ट (वार्ता.) – २१ ऑगस्टला उत्तररात्री जुन्या मांडवी पुलावर ‘जेट पॅचर’ यंत्राचे (रस्त्यावरील खड्डे बुजवणारे यंत्र) काम चालू असतांना भरधाव वाहन चालवणार्‍या मद्यधुंद चारचाकी चालकाने ३ कामगारांना धडक दिली. या अपघातात अमित यादव (वय २५ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाला, तर अभयराय निर्मल आणि धीरज शर्मा हे कामगार गंभीररित्या घायाळ झाले आहेत. वळवई, फोंडा येथील रहिवासी असलेला चारचाकी चालक संकेत चंद्रकांत शेट (वय ३७ वर्षे) याला पोलिसांनी कह्यात घेऊन त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

अपघातात चारचाकी चालकाच्या धडकेने तिन्ही कामगार चारचाकी वाहन आणि ‘जेट पॅचर’ यंत्र यामध्ये चिरडले गेले. अमित यादव याचा जागीच मृत्यू झाला. घायाळ कामगारांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार चालू आहेत. अपघातानंतर चालकाची म्हापसा येथील रुग्णालयात ‘अल्कोमीटर’ चाचणी (मद्यप्राशनाची चाचणी) करण्यात आली असता चारचाकी चालकाने प्रमाणापेक्षा अधिक मद्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजय चोडणकर अधिक अन्वेषण करत आहेत.

मद्यपान करून गाडी चालवल्याने दुसर्‍या व्यक्तीला इजा झाल्यास कायद्यानुसार गुन्हेगाराला २ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. अपघातात दुसर्‍या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास गुन्हेगारास मोठ्या दंडासह २ ते ७ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. केवळ मद्यपान करून गाडी चालवतांना पोलिसांनी पकडल्यास  २ ते ५ सहस्र रुपयांपर्यंत चालकाला दंड भरावा लागतो. (हा दंड पहायला गेल्यास चारचाकी वाहन असलेल्या व्यक्तीसाठी अगदीच क्षुल्लक आहे. त्यामुळे व्यक्ती मद्यपान करून वाहन चालवण्याच्या कृतीपासून परावृत्त कशी होणार ? – संपादक)

मद्यधुंद वाहनचालकांमुळे झालेल्या भीषण अपघातांना उजाळा

१. सुमारे १ वर्षांपूर्वी बाणस्तारी पुलाजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मर्सिडिज वाहनाच्या चालकाने समोरून येणार्‍या वाहनांना ठोकर दिली होती. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता, तर अन्य तिघे गंभीररित्या घायाळ झाले होते. या प्रकरणी अजूनही न्यायालयात संशयिताच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) झालेले नाही.

२. वेर्णा येथे काही महिन्यांपूर्वी एका मद्यधुंद बसचालकाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीवर बस चढवल्याने ४ जणांचा मृत्यू झाला होता.