अतिक्रमण हटवा आणि भूमीचे उत्खनन करून ऐतिहासिक वारसा जनतेसमोर आणा ! – हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा

‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी चर्च संस्थेचे अतिक्रमण

पणजी, २२ ऑगस्ट – चर्च संस्था गेल्या ११ वर्षांपासून खोटी कथानके रचून पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ‘फ्रंटीस पीस ऑफ साकंवाळ’ हे वारसा स्थळ आपल्या कह्यात घेऊ पहात आहे. चर्च संस्थेने या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करणे, वडाचे झाड तोडणे, तळे बुजवणे, पुरातन मंदिराचे अवशेष भूमीत गाडणे आदी कृती केलेल्या आहेत. गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याने गतवर्षी मुरगाव नगरनियोजन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत या वारसा स्थळाचे पहिल्यांदा संयुक्त सर्वेक्षण केले आणि यातून चर्च संस्थेने वारसा स्थळी अतिक्रमण केल्याचे उघड झाले आहे. अतिक्रमणाची माहिती आता पहिल्यांदा सरकारी कागदोपत्री आलेली आहे. सरकारने तातडीने वारसा स्थळावरील अतिक्रमण हटवावे आणि या ठिकाणी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भूमीचे उत्खनन करून या जागेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जनतेसमोर आणावा, अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीने केली आहे. ही माहिती हिंदू रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली.

हिंदू रक्षा महाआघाडीच्या शिष्टमंडळाने २२ ऑगस्ट या दिवशी पुरातत्व खात्याचे संचालक श्री. नीलेश फळदेसाई आणि उपसंचालक श्री. दत्तराज गावस देसाई यांची भेट घेतली.

या भेटीनंतर प्रा. सुभाष वेलिंगकर पत्रकारांशी बोलत होते. या वेळी हिंदू रक्षा महाआघाडीच्या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा प्रमुख श्री. नितीन फळदेसाई, गोवा मंदिर महासंघाचे श्री. चंद्रकांत पंडित आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत यांचा समावेश होता. प्रा. सुभाष वेलिंगकर पुढे म्हणाले, ‘‘हिंदू रक्षा महाआघाडी लवकरच चर्च संस्थेच्या वारसा स्थळ कह्यात घेण्याच्या कारवायांविषयी राज्यस्तरावर जनजागृती करणार आहे. ही जागा आम्हाला अयोध्येसारखी आहे. ही जागा आम्ही चर्चच्या घशात जाऊ देणार नाही. या स्थळाच्या जागृतीसाठी आम्ही लहान पुस्तिका छापली आहे.’’

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांचे प्रतिकात्मक मंदिर अमान्य

गोव्यात पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांचे प्रतिकात्मक मंदिर उभारण्याचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे. हा पलायनवाद आहे आणि स्वाभिमानी जनता हे स्वीकारणार नाही, असेही प्रा. वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व खाते स्वतःहून सत्य जनतेसमोर का आणत नाही ?