१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’च्या वेळी चंद्रपूर येथील डॉ. (सौ.) सत्याली देव यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. साधकांचा प्रेमभाव अनुभवणे
‘मी आश्रमातील ९० टक्के साधकांना प्रथमच भेटत असूनही त्यांच्याशी माझे अनेक जन्मांचे ऋणानुबंध आहेत’, असे मला जाणवले. मी माझी ओळख न सांगता आश्रमातील साधक माझ्याशी प्रेमभावाने बोलत होते. ते शिबिरार्थींची सर्व प्रकारे काळजी घेत होते. ते निवासस्थानी असलेल्या शिबिरार्थींचीही प्रेमाने विचारपूस करून साहाय्य करत होते. यावरून आश्रमातील साधकांमध्ये ‘गुरुदेवांच्या प्रीतीची शिकवण रूजली आहे’, हे मला अनुभवता आले.
२. ‘आश्रम म्हणजे भूलोकातील वैकुंठच आहे’, याची साधिकेला अनुभूती येणे
आश्रमातील ९ दिवसांच्या वास्तव्यात मी साधक, संत आणि सद्गुरु यांच्याकडून प्रेम अनुभवले. ‘मी माझ्या माहेरी आली आहे’, असे मला वाटले. आश्रमातील कार्यपद्धती, नियोजन आणि प्रेमभाव हे सर्वच अगदी बालसाधकांपासून वयोवृद्ध साधकांपर्यंत सर्वांकडून शिकण्यासारखे आहे. ‘आश्रम म्हणजे भूलोकातील वैकुंठच आहे’, याची मला अनुभूती आली.
३. गुडघेदुखीचा त्रास उणावणे
मला गुडघेदुखीचा त्रास आहे. शिबिराच्या कालावधीत २ दिवस मला असह्य त्रास झाला. शिबिरानंतर २ वेळा संतांच्या नामजपादी उपायांना बसण्याची मला संधी मिळाली. त्यानंतर माझ्या गुडघ्यातील वेदना बर्याच उणावल्या.
४. श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पहातांना श्रीरामाच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बालवयातील रूप दिसणे
आश्रमात असतांना अयोध्येतील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहायला मिळाले. ते पहात असतांना मला श्रीरामाच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बालवयातील रूप दिसत होते. तेव्हा मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील त्यांचे बालरूप आठवले. त्या कालावधीत मला दिवे लावणे आणि रांगोळी काढणे या सेवाही मिळाल्या.
५. ‘आश्रमात बोरे मिळतील का ?’, हा मनात आलेला विचार गुरूंनी पूर्ण करणे
आश्रमात असतांना ‘आपल्या गावी मिळतात, तशी बोरे इथे मिळत असतील का ?’, असा विचार माझ्या मनात आला. मी गावी परत जाण्याच्या दिवशी आश्रमात महाप्रसादाच्या समवेत बोरे ठेवलेली दिसली. त्या वेळी ‘गुरुमाऊली आपली कुठलीच इच्छा अपूर्ण ठेवत नाही’, असे वाटून माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आश्रमातील अस्तित्वामुळे आनंद मिळणे
‘आज शिबिरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ येतील का ?’, असे विचार माझ्या मनात प्रतिदिन यायचे. ‘त्या अयोध्येला गेल्यामुळे भेट होऊ शकणार नाही’, असे मला कळले. तेव्हा ‘माहेरी आल्यावर आई घरी नाही’, असे मला वाटले. मी घरी परतण्याच्या एक दिवस आधी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आश्रमात आल्याचे कळले आणि माझी रुखरूख दूर झाली. त्यांच्या केवळ आश्रमातील अस्तित्वाने मला आईला भेटल्याचा आनंद मिळाला.
‘हे गुरुमाऊली, आपल्या अनंत कृपेमुळे मला या भूवैकुंठलोकात येण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– डॉ. (सौ.) सत्याली देव, चंद्रपूर (२५.१.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |