Rakesh Tikait Controversial Statement : भारतातही बांगलादेशासारखे आंदोलन होऊ शकते ! – भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत

मेरठ (उत्तरप्रदेश) – ‘भारतीय किसान युनियन’चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, भारताचीही परिस्थिती बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यासारखी आहे. बांगलादेशमध्ये झाले, तसेच आंदोलन भारतातही होऊ शकते. २० ऑगस्ट २०२४ या दिवशी राकेश टिकैत ‘पश्‍चिमांचल विद्युत वितरण निगम’च्या कार्यालयात विजेसंदर्भातील तक्रारींविषयी वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी मेरठ येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

टिकैत पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलनात ७५० हून अधिक शेतकर्‍यांनी बलीदान दिले; मात्र केंद्र सरकार त्यावर काहीही बोलले नाही. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना विनामूल्य वीज देण्याची घोषणा केली; मात्र मीटर बसवण्याची अट घातली आहे. शेतकरी कूपनलिकांवर मीटर बसवू देणार नाहीत. मीटर बसवल्यास ते काढून वीज कार्यालयात जमा करण्यात येणार आहे.

टिकैत यांनी प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवरही भाष्य केले. कोलकाता येथील एका डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येची घटना निंदनीय असल्याचे सांगून ते म्हणाले की, या घटनेविषयी प्रसारमाध्यमांमध्ये ज्या प्रकारची स्पष्टोक्ती दिसून येत आहे, ती मणीपूरमधील घटनेच्या वेळी दिसली नाही.