‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या कालावधीत धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. सेवा करतांना देहभान विसरणे

‘दुपारी १.३० ते अनुमाने ५ – ६ वाजेपर्यंत रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा असायची. माझे पाय दुखतात आणि मला अन्य शारीरिक अडचणी आहेत. मी पाहुण्यांना आश्रम दाखवत असतांना देहभान विसरायचे. त्यामुळे माझ्या शारीरिक दुखण्याकडे माझे लक्ष जात नसे.

२. ‘आश्रमातील सर्व साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सिद्ध केले आहे’, हे सांगतांना पुष्कळ आनंद वाटणे

श्रीमती अश्विनी प्रभु

‘ही आश्रम दाखवण्याची सेवा आणखी उत्तम रितीने कशी करता येईल ?, ‘सहसाधकसुद्धा आश्रम दाखवतांना कसे सांगत आहेत?’, हे शिकण्याचा मी प्रयत्न करत होते. ‘आश्रमातील सर्व साधकांना आमच्या गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सिद्ध केले आहे’, हे सांगताना पुष्कळ आनंद वाटत होता.’

३. चहा पिण्याची सवय जाणे

मला दुपारी ३ वाजता चहा पिण्याची सवय होती. मी आश्रम दाखवण्याची सेवा करतांना चहा पिण्याचे विसरून जायचे. गुरुकृपेने माझी चहा पिण्याची सवय बंद झाली.

४. सर्व साधकांमध्ये आश्रमाविषयी आपुलकी निर्माण होऊन संघभावना वृद्धींगत होणे

आश्रम दाखवण्याचे नियोजन करणारे साधक आणि आश्रम दाखवण्याची सेवा करणारे साधक यांचे मला कौतुक वाटत होते. ही सेवा करणारे साधक एकमेकांना स्वतःचे अनुभव सांगून त्यातील आनंद घेत होते. त्यामुळे सर्व साधकांमध्ये आश्रमाविषयी आपुलकी निर्माण होऊन संघभावना वृद्धींगत झाली.

५. आश्रमाची माहिती सांगणे, म्हणजे गुरुस्तुती करणे

आश्रमातील प्रत्येक वस्तू, साधक आणि यंत्रणा इत्यादींमध्ये मला गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अनुभवता आले. ‘आश्रम म्हणजे गुरुदेव आणि गुरुदेव म्हणजे आश्रम’, असे मला वाटत होते. तसेच ‘मी आश्रमाची माहिती सांगतांना गुरुदेवांची महती सांगत आहे’, असे मला वाटत होते. ‘पाहुण्यांना आश्रमाची माहिती सांगणे, म्हणजे गुरुस्तुती करणे’, असे मला वाटत होते. ‘यांमुळे माझ्यात व्यापकता आली’, असे मला अनुभवता आले.

६. ‘आश्रम दाखवतांना प्रत्येक वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे सूक्ष्म रूपात समवेत आहेत’, याची अनुभूती येणे

‘स्थूलदेहाला स्थळकाळाची मर्यादा असते; परंतु ‘सनातन’ या नित्य नूतन रूपात मी सर्वत्र आहे. ‘प्रत्यक्ष स्थूलापेक्षा सूक्ष्म रूपात मी सतत तुमच्यासह आहे’, असे गुरुदेवांनी साधकांना वचन दिले आहे. आश्रम दाखवतांना प्रत्येक वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे सूक्ष्म रूपात समवेत आहेत’, याची मला अनुभूती येत होती‌.

‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे) मंगळुरू, कर्नाटक (३.७.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक