संपूर्ण हिंदुस्थानातील पहिलाच उपक्रम !
सोलापूर – समस्त हिंदु समाजाच्या वतीने ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरि महाराज यांच्या रसाळ वाणीत छत्रपती शिवाजी महाराज कथेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कथा १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात प्रतिदिन दुपारी ३ ते सायं. ७ पर्यंत होणार आहे. श्रीरामकथा, श्री भागवत कथा याप्रमाणे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर कथेचे आयोजन करण्याचा संपूर्ण हिंदुस्थानातील हा पहिलाच उपक्रम आहे, अशी माहिती अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सल्लागार समिती सदस्य, ‘विकास सहकारी बँके’चे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखापरीक्षक श्री. राजगोपाल मिणीयार यांनी दिली. या कथेच्या अनुषंगाने शहरातील शिवप्रेमींची सिद्धतेची बैठक १८ ऑगस्टला विकास सहकारी बँकेच्या सभागृहात झाली. त्या प्रसंगी ते बोलत होते.
श्री. मिणीयार पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील कथेच्या पहिल्या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापासून ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.’’ या प्रसंगी श्री. हेमंत पिंगळे म्हणाले, ‘‘शोभायात्रेमध्ये पारंपरिक मर्दानी खेळ, पारंपरिक वाद्ये यांचा समावेश असणार आहे. भारतीय संस्कृतीतील पेहराव करून विविध ज्ञाती संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच समस्त हिंदु समाज बांधव यांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे.’’
या बैठकीला माजी नगरसेवक श्री. विनोद भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर, रंजीता चाकोते, संपदा जोशी, सर्वश्री अनंत जाधव, संजय साळुंखे, शशी थोरात, महेश धाराशिवकर, श्रीशैल बनशेट्टी, बिज्जू प्रधाने, प्रियदर्शन साठे, अश्विन कडलासकर, नीलेश कांबळे, रवी गोणे, सुधीर बहिरवाडे, दत्तात्रय वानकर, सूरज पाटील, वैभव गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.