Raichur School Food Poisoning : विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणात मिसळण्यात आले विष !

  • रायचूर (कर्नाटक) येथील वसतीगृह शाळेतील घटना

  • जेवण वाढण्यापूर्वी ते तपासणार्‍या महिला स्वयंपाक्याला झाली विषबाधा !

विष मिसळले गेल्यामुळे पालटला गेलेला सांबराचा रंग

रायचूर (कर्नाटक) : देवदुर्ग तालुक्यातील आलकोड कस्तुरबा वसतीगृह शाळेत दुपारच्या जेवणातील सांबार खाल्ल्यानंतर एक महिला साहाय्यक स्वयंपाकी गंभीरपणे आजारी पडली. जेवणातील सांबारामध्ये विष मिसळण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्यांनी भोजन घेतले नव्हते.

स्वयंपाक सिद्ध झाल्यानंतर जेवणासाठी सिद्धता करण्यात आली  होती. या वेळी सांबारचा रंग पालटल्याचे स्वयंपाक साहाय्यक विजयलक्ष्मी यांच्या लक्षात आले. त्यामुळे मुलांना जेवण वाढण्यापूर्वी त्यांनी स्वत: सांबार खाऊन बघितला. जेवणानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कळताच मुलांच्या पालकांनी संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे भोजन केले असते, तर काय घडले असते ?, असा प्रश्‍न पालकांनी उपस्थित केला. या घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारच्या जेवणातील भात आणि सांबारचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या घटनेविषयी जालहळ्ळी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे.

विष मिसळणारे गुन्हेगार कोण ?

वैयक्तिक कारणांमुळे स्वयंपाकी, वॉर्डन (व्यवस्था पहाणारा अधिकारी) आणि शिक्षक यांच्यामध्ये गेल्या वर्षभरापासून भांडण चालू होते. वसतीगृहातील कर्मचार्‍यांमध्ये चालू असलेल्या या अंतर्गत वादामुळे गरीब विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे. तात्पुरता कार्यभार असणारे मुख्याध्यापक सुट्टीवर गेलेल्या दिवशीच सांबारमध्ये विष मिसळल्यामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.

संपादकीय भूमिका

याला उत्तरदायी असणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा करा !